देशात लहान मुलांसाठी लस ऑगस्टपर्यंत उपलब्ध होईल

- कोविड टास्क फोर्सच्या डॉ. अरोरा यांची माहिती

नवी दिल्ली – झायडस कॅडिला या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने मुलांसाठी विकसित केलेल्या लसीबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या लसीच्या चाचण्या जवळजवळ पुर्ण झाल्या असून पुढील महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला ही लस लसीकरणासाठी उपलब्ध होईल, अशी माहिती नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनचे (एनटीएजीआय) अध्यक्ष डॉ.एन.के. आरोरा यांनी दिली आहे. याआधी कोव्हॅक्सिनच्या लसींच्या चाचण्याही लहान मुलांवर सुरू झाल्या आहेत व ही लस सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होईल, असे एम्सचे संचालक रणदिप गुलेरिया म्हणाले होते. त्यामुळे लवकरच लहान मुलांसाठी देशात दोन लसी उपलब्ध होतील.

देशात लहान मुलांसाठी लस ऑगस्टपर्यंत उपलब्ध होईल - कोविड टास्क फोर्सच्या डॉ. अरोरा यांची माहितीझायडस कॅडिला कंपनीने 12 वर्षांवरील मुलांसाठी तयार केलेल्या लसीच्या चाचण्या पुर्ण झाल्या आहेत व येत्या आठ ते दहा दिवसात कंपनीकडून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी अर्ज करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच पुढील महिन्याच्या अखेरीस ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून या लसीला मंजुरी मिळू शकेल. जूलै अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातील मंजुरी मिळाल्यावर ही लस 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी उपलब्ध होईल, असा अंदाज डॉ. आरोरा यांनी व्यक्त केली. तसेच ही लस इतर लसींपेक्षा वेगळी असून या लसीचे तीन डोस द्यावे लागत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, देशात सध्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन व रशियाच्या स्पुटनिक-बी लसीद्वारे लसीकरण सुरू आहे. 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू असून 21 तारखेपासून दिवसला सरासरी 60 लाख जणांचे लसीकरण होत आहे.

leave a reply