दमास्कस – सिरियाच्या मसयाफ भागातून प्रवास करणाऱ्या लष्करी बसवर झालेल्या हवाई हल्ल्यात 10 जवान मारले गेले तर नऊ जण जखमी झाले. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी ही कारवाई केल्याचा दावा सिरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने केला. गेल्या आठवड्याभरात इस्रायलने सिरियात चढविलेला तिसरा हल्ला ठरतो.
शुक्रवारी रात्री सिरियाच्या वायव्येकडील अलेप्पो प्रांतात ही कारवाई झाली. सिरियन वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या बसवर झालेल्या या हल्ल्यात 10 जवान ठार तर नऊ जण जखमी झाले. सिरियन लष्कराने त्वरीत हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्याचा दावा या वृत्तवाहिनीने केला. पण सदर ठिकाणी किमान अर्धा तास तरी हवाई हल्ले सुरू होते, असे स्थानिकांनी म्हटले आहे. त्यामुळे या भागात जबर हवाई हल्ले झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते.
अलेप्पो प्रांतात ‘अहरार अल-शाम’ या अल कायदा संलग्न दहशतवादी संघटनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे दहशतवादी संघटनेने सिरियन लष्कराला लक्ष्य करण्यासाठी रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविल्याची बातमीही सिरियन वृत्तवाहिनीने दिली होती. पण पुढच्या काही तासातच या वृत्तवाहिनीने सदर हल्ल्यासाठी इस्रायलला दोषी धरले. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियात घुसखोरी करून हे हल्ले चढविल्याचा आरोप या वृत्तवाहिनीने केला.
परदेशी माध्यमांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्याची इस्रायलची भूमिका नाही. त्याचबरोबर इस्रायलने फार कमी वेळा सिरियातील हवाई हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. शुक्रवारच्या हल्ल्याबाबतही इस्रायली लष्कराने प्रतिक्रिया देण्याचे टाळले. पण अलेप्पो येथील इराणच्या ठिकाणाला लढाऊ विमानांनी लक्ष्य केल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. याआधीही इस्रायली लढाऊ विमानांनी सिरियातील इराणसंलग्न ठिकाणांना लक्ष्य केल्याची आठवण इस्रायली माध्यमे करून देत आहेत.
मसयाफ या भागात इराणचे लष्करी तळ होते. काही वर्षांपूर्वी इराणसंलग्न दहशतवाद्यांनी या तळाचा वापर केला होता. इस्रायलने या तळावर हल्लाही चढविला होता. याशिवाय मसयाफ भागात सिरियाचे ‘सायन्टिफिक स्टडिज् अँड रिसर्च सेंटर’ असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. या प्रयोगशाळेत रासायनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती सुरू होती, असे आरोप याआधी झाले होते. सरीन या प्राणघातक गॅसची निर्मिती देखील याच प्रयोगशाळेत झाल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला होता. सिरियातील अस्साद राजवटीने हा आरोप फेटाळला होता. पण त्यानंतर या प्रयोगशाळेवरही हवाई हल्ले झाले होते.
सिरियातील अलेप्पो प्रांत तसेच आसपासच्या प्रांतांची हवाईहद्द रशियन लष्कराच्या नियंत्रणाखाली असल्याचा दावा केला जातो. गेल्या काही आठवड्यांमध्ये युक्रेनवरील संघर्षाच्या मुद्यावरुन इस्रायल आणि रशियातील संबंधात मतभेद निर्माण झाले आहेत. असे असताना, इस्रायलचे मसयाफवरील हल्ले लक्षवेधी ठरतात.