‘सी-डी-इ’च्या पलिकडे जाऊन भारत व ऑस्ट्रेलियाचे संबंध विकसित झाले आहेत

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

सिडनी – दोन्ही देशांमधले भौगोलिक अंतर फार मोठे असले तरी ऑस्ट्रेलियात वास्तव्य करणाऱ्या भारतीयांनी दोन्ही देशांना जवळ आणले आहे. क्रिकेट, करी आणि कॉमनवेल्थ या तीन ‘सी’मुळे दोन्ही देश एकत्र आले, असे सांगितले जात होते. पुढच्या काळात डेमोक्रासी, डायस्‌‍पोरा आणि दोस्ती या तीन ‘डी’ने अर्थात लोकशाही, ऑस्ट्रेलियातील भारतीय आणि मैत्रीने दोन्ही देशांना जोडल्याची चर्चा होती. पण आता तीन ‘इ’ अर्थात एनर्जी, इकॉनॉमी आणि एज्युकेशन यामुळे भारत-ऑस्ट्रेलियामधील संबंधांचा आधार असल्याचे दावे केले जातात. मात्र उभय देशांचे ऐतिहासिक संबंध या सर्वांच्याही कितीतरी पलिकडे गेलेले आहेत. परस्परांवरील विश्वास आणि एकमेकांचा आदर, हा भारत व ऑस्ट्रेलियाच्या संबंधांचा भक्कम आधार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

‘सी-डी-इ’च्या पलिकडे जाऊन भारत व ऑस्ट्रेलियाचे संबंध विकसित झाले आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदीऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील सुमारे २० हजार आसनक्षमता असलेल्या भरगच्च सभागृहात पंतप्रधान मोदी बोलत होते. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, माजी पंतप्रधान टोनी ॲबट यावेळी उपस्थित होते. ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी भारतीयांचा सहर्ष स्वीकार करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडे मोठे मन असल्याचे या देशाची प्रशंसा केली. सिडनीच्या उपनगरातील हॅरिस पार्कमध्ये ‘लिटिल इंडिया’ची दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. हा भाग आता लिटिल इंडिया म्हणून ओळखला जाईल. भारतीयांनी ऑस्ट्रेलियाच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाची पोचपावती याद्वारे मिळाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारत म्हणजे हजारो वर्षांपासून चालत आलेली जिवंत परंपरा आहे. भारत ही लोकशाहीची जननी आहे. भारताने आपल्या मुलभूत सिद्धांतांशी कधीही तडजोड न करता चांगल्या नव्या गोष्टींचा स्वीकार केला. ‘वसुधैव कुटुंबक्‌‍म’ ही भारताची विचारसरणी आहे. त्यामुळे भारत आपल्या हिताशी जगाचे हित जोडून घेतो. सर्वाधिक विकासदराने प्रगती करीत अलेला भारत अनिश्चित व अस्थिरतेच्या काळात जगासाठी ‘ब्राईट स्पॉट’ अर्थात चमकता तारा म्हणून उदयाला आला आहे, याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले. तसेच दरम्यान, ऑस्ट्रेलियातील भारतीयांची मागणी लक्षात घेऊन ब्रिस्बन येथे दूतावास सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केली.

तर भारताच्या पंतप्रधानांइतके अपूर्व स्वागत दुसऱ्या कुणाचेही झाले नव्हते, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज म्हणाले. भारत ऑस्ट्रेलियाचा धोरणात्मक भागीदार देश आहे. दोन्ही देशांमध्ये उत्तम मैत्रीपूर्ण संबंध आहे आणि क्रिकेटमध्ये उभय देश एकमेकांशी जबरदस्त स्पर्धा करतात, असे पंतप्रधान अल्बानीज पुढे म्हणाले.

leave a reply