रशिया जर्मनीतील सरकार उलथण्याच्या प्रयत्नात

- जर्मन गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांचा आरोप

बर्लिन – जर्मनीतील लोकशाही सरकारविरोधात बंड घडविण्याचा मोठा कट उधळल्याचा दावा जर्मनीच्या सुरक्षा यंत्रणेने केला. याप्रकरणी तीन संशयित कट्टरपंथियांना ताब्यात घेतले असून तिघेही ‘रिच्सबर्गर’ या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा दावा जर्मन सुरक्षा यंत्रणा करीत आहेत. यातील महिला कट्टरपंथी काही महिन्यांपूर्वी रशियन राजनैतिक अधिकाऱ्याच्या संपर्कात असल्याचे जर्मन यंत्रणेचे म्हणणे आहे. तर रशिया जर्मन समाजात फूट निर्माण करुन सरकार उधळण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप जर्मनीच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी केला आहे.

जर्मनीच्या ‘फेडरल ऑफिस फॉर दी प्रोटेक्शन’ या प्रमुख गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख थॉमस हॅडनवँग यांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आपल्या देशाच्या लोकशाहीला मोठा धोका संभवत असल्याचा इशारा दिला. ‘रिच्सबर्गर’ आणि इतर काही कट्टरपंथी संघटना जर्मनीतील लोकशाही सरकार उधळण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा हॅडनवँग यांनी केला. गेल्या काही वर्षांमध्ये रिच्सबर्गर या संघटनेचे बंडाळीचे काही कट उधळल्याची माहिती जर्मन गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी दिली. रिच्सबर्गरच्या दहशतवाद्यांनी जर्मनीतील पायाभूत सुविधा, प्रशासकीय अधिकारी आणि संसदीय इमारतीवर हल्ल्याचा कटही आखला होता, असा दावा हॅडनवँग यांनी केला.

या कट्टरपंथी संघटनांना जर्मनीतील प्रशासकीय व लोकशाही व्यवस्थाच मान्य नाही. यामुळे हे गट जर्मन समाजात आणि स्थलांतरितांमध्ये सरकारविरोधी भीती निर्माण करीत असल्याचा आरोप हॅडनवँग यांनी केला. जर्मनीतील सरकार देशाचे प्रश्न, समस्या सोडविण्यात अयशस्वी ठरत आहेत, असा भ्रम निर्माण केला जात आहे. याचा वापर करुन जर्मनीत उलथापालथ घडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चिंता हॅडनवँग यांनी व्यक्त केली. युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीतील लोकशाही सरकार अस्थिर करण्यासाठी रशिया प्रयत्न करीत असल्याचा ठपका हॅडनवँग यांनी ठेवला. रशियन माध्यमे अपप्रचाराचा वापर करीत असल्याचेही जर्मन गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख म्हणाले.

हॅडनवँग ही मुलाखत देत असताना, सोमवारी संध्याकाळी जर्मनीच्या सुरक्षा यंत्रणेने नैॠत्येकडील बॅडेन-वुर्टेनबर्ग येथील प्रांतात केलेल्या कारवाईत तीन संशयितांना ताब्यात घेतले. जोहाना, हान्स-जोकिम आणि स्टिफन अशी या तीन संशयितांची नावे जर्मन यंत्रणेने प्रसिद्ध केली. हे तिघेही रिच्सबर्गर या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा दावा जर्मन सुरक्षा यंत्रणेने केला. यापैकी जोहाना ही काही महिन्यांपूर्वी रशियन राजनैतिक अधिकाऱ्याच्या संपर्कात होती. तर हान्स-जोकिम याने दीड लाख डॉलर्सहून अधिक निधी गोळा केला होता. स्टिफन हा जर्मनीच्या सुरक्षा यंत्रणेचा जवान होता. रिच्सबर्गर या संघटनेला दुसऱ्या महायुद्धानंतरचे जर्मनीचे अस्तित्व अजिबात मान्य नाही. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सच्या प्रभावाखाली असलेली जर्मनीतील लोकशाही व्यवस्था कधीच मान्य करणार नसल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. १८७१ साली प्रस्थापित झालेली जर्मन राजवट हीच आपली ओळख असून ती प्रस्थापित करण्यासाठी हिंसाचाराचा वापर करण्याचे संकेतही या संघटनेने याआधी दिले होते.

हिंदी

 

leave a reply