आफ्रिका खंडात एका दिवसात कोरोनाचे सुमारे १० हजार रुग्ण

वॉशिंग्टन – कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेबाबतची भीती प्रत्यक्षात उतरत असल्याचे संकेत मिळत आहेत. चीन,अमेरिका व ब्राझीलसह आफ्रिका खंडातील रुग्णांची वाढती संख्या याला पुष्टी देणारी ठरली आहे. आफ्रिका खंडात एका दिवसात कोरोनाचे सुमारे १० हजार रुग्ण आढळले असून चीनच्या राजधानीतही नव्या रुग्णांची संख्या १०० वर गेली आहे. याच पार्श्वभूमीवर, ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात, ‘डेक्सामेथॅसोन’ हे औषध कोरोनाच्या साथीवर प्रभावी ठरत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आफ्रिका, कोरोना

गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या बळींची संख्या साडेचार हजारांहून अधिक नोंदविण्यात आली असून रुग्णांच्या संख्येतही सुमारे सव्वा लाखांहुन अधिक रुग्णांची भर पडली आहे. ‘वर्ल्डओमीटर’ वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ८१,८३,८५३ झाली असून गेल्या २४ तासांमध्ये त्यात १,३३,४७६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. गेल्या २४ तासात कोरोनाच्या बळींच्या संख्येत तब्बल ४,५७० जणांची वाढ झाली असून एकूण बळीची संख्या ४,४१,१८० झाली आहे. जगभरात आतापर्यंत एकूण ४२,६८,१९० रुग्ण कोरोना साथीतून बरे झाले आहेत.

अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या ५८४ बळींची नोंद झाली असून एकूण बळींची संख्या १,१८,५३५ झाली आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या २१,९०,३१५ झाली असून २४ तासांमध्ये त्यात २० हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. अमेरिकेनंतर कोरोनाच्या साथीचा सर्वाधिक फटका बसलेल्या ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ३४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९,०४,७३४ झाली आहे. त्याचवेळी कोरोनाच्या साथीत बळी जाणाऱ्या रुग्णांची संख्या ४४,६५७ झाली असून २४ तासांमध्ये त्यात १,२६१ बळींची भर पडली आहे.

आफ्रिका, कोरोना

आफ्रिका सिडीसी’ या संस्थेने आफ्रिका खंडातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत २४ तासांमध्ये ९,७६१ जणांची वाढ झाल्याची माहिती दिली. आफ्रिका खंडातील रुग्णांची एकूण संख्या २,५१,८६६ झाली आहे. ही माहिती आफ्रिका खंडातील ५४ देशांची असून बळींची संख्या ६,७६९ झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, चीनची राजधानी बीजिंगमधील कोरोना साथीच्या नव्या रुग्णांची संख्या १०६ वर जाऊन पोहोचली आहे. सोमवारी रुग्णांच्या संख्येत २७ जणांची भर पडली असून हेबेई व सिच्युआन प्रांतातही नवे रुग्ण आढळले आहेत. राजधानी बीजिंगमधील साथीची स्थिती अतिशय गंभीर असल्याची माहिती सरकारी प्रवक्ते शु लेजन यांनी दिली. बीजिंगमधील लॉकडाऊन केलेल्या भागांची संख्या ३० वर गेली असून दिवसाला सुमारे ९० हजारांहून अधिक चाचण्या करण्याची तयारी केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

leave a reply