मोगादिशु – अमेरिकेच्या ‘आफ्रिका कमांड’ने सोमालियात केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये ‘अल-शबाब’चे 13 दहशतवादी ठार झाले आहेत. अमेरिकेने गेल्या आठवड्याभरात ‘अल-शबाब’विरोधात कारवाई करण्याची ही दुसरी वेळ ठरते. सोमालियन लष्कराकडून मध्य सोमालियातील हिरान प्रांतात दहशतवादविरोधी मोहीम सुरू आहे. या मोहिमेला सहाय्य करताना अमेरिकेने हे हवाई हल्ले चढविल्याचे सांगण्यात येते.
रविवारी दुपारी अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी हिरान प्रांतात हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये अल-शबाबचे तळ तसेच शस्त्रसाठा लक्ष्य करण्यात आला. यात तळावर असलेले दहशतवादी मारले गेले. सुरुवातीला त्यांची संख्या समोर आली नव्हती. मात्र सोमालियन माध्यमे तसेच लष्करी सूत्रांनी 13 दहशतवादी ठार झाल्याची माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात मंगळवारी आफ्रिका कमांडने ड्रोन हल्ला चढवून अल-शबाबच्या चार दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यानंतर सलग दुसरा हल्ला चढवून अमेरिकेने सोमालियातील दहशतवादविरोधी मोहिमेला वेग दिल्याचे दिसत आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमालियातून अमेरिकी तैनाती मागे घेतली होती. मात्र राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सोमालियात पुन्हा तैनातीची घोषणा केली आहे. अमेरिकेचे सुमारे 500 जवान सोमालियात तैनात करण्यात आले आहेत. या तैनातीनंतर अमेरिकेकडून सोमालियात होणारे हवाई हल्ले वाढल्याचे दिसत आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यांपूर्वी अमेरिकेच्या ‘आफ्रिका कमांड’मध्ये नेतृत्वबदल झाला असून मरिन कॉर्प्सचे जनरल मायकल लँगले कमांडचे नवे प्रमुख म्हणून नियुक्त झाले आहेत.
लँगले यांच्या हाती सूत्रे देताना ‘आफ्रिकॉम’चे माजी प्रमुख जनरल स्टीफन टाऊनसेंड यांनी अमेरिकेच्या आफ्रिका धोरणावर नाराजी व्यक्त केली. आफ्रिका खंडात दर दिवशी नवी आव्हाने उभी रहात आहेत. पण या आव्हानांना तोंड देण्यासाठी अमेरिका पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ व इतर साधने उपलब्ध करून देत नाही, असा ठपका टाऊनसेंड यांनी ठेवला. त्याचवेळी अमेरिकेने आफ्रिका खंडाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करु नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.