सुलेमानिया/कोया – इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने इराकच्या कुर्दिस्तान प्रांतात चढविलेल्या ड्रोन्सच्या हल्ल्यांमध्ये १३ जण ठार झाले. इराणमधील अस्थैर्यासाठी कुर्दिस्तानमधील दहशतवादी जबाबदार असल्याचा आरोप करून इराणने या हल्ल्याचे समर्थन केले. इराणच्या या कारवाईला उत्तर देण्यासाठी आपली आपली लढाऊ विमाने रवाना करून इराणचे ड्रोन पाडले, असा दावा अमेरिकेने केला आहे. गेल्या चार दिवसात इराणने इराकमधील कुर्दिस्तानमध्ये चढविलेला हा दुसरा हल्ला ठरतो.
इराकचा स्वायत्त प्रांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुर्दिस्तानमधील राजधानी इरबिल आणि सुलेमानिया या दोन प्रमुख शहरांवर बुधवारी ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचे भीषण हल्ले झाले. सुलेमानिया येथील कुर्दांच्या १० ठिकाणांना लक्ष्य केल्याचा आरोप इराकी कुर्द करीत आहेत. या हल्ल्यांमध्ये १३ कुर्दांचा बळी गेला तर ५८ जण जखमी झाल्याची माहिती कुर्दिस्तानातील सुरक्षा यंत्रणांनी दिली. पण ड्रोन्सच्या हल्ल्यांची तीव्रता पाहता बळींची संख्या मोठी असल्याची शक्यता वर्तविली जाते.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने इराकमधील हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. यावेळी आत्मघाती ड्रोन्स आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचे रिव्होल्युशनरी गार्ड्सकडून स्पष्ट करण्यात आले. गेल्या बारा दिवसांपासून इराणमध्ये पेटलेल्या हिजाबविरोधी आंदोलनामागे या कुर्दिस्तान प्रांतातील दहशतवादी असल्याचा ठपका रिव्होल्युशनरी गार्ड्सनी ठेवला. तसेच यापुढेही इराणच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणाऱ्या कुर्दिस्तानातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करणार असल्याचा इशारा इराणच्या लष्करी संघटनेने दिला.
यानंतर आखातातील लष्करी कारवाईची जबाबदार असलेल्या अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड-सेंटकॉम’ने ‘एफ-१५’ लढाऊ विमान रवाना करून इराणचे ‘मोजाहेर-६’ ड्रोन पाडल्याचा दावा केला. तर इराकने इराणच्या राजदूताला समन्स बजावले. एक कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या कुर्दिस्तान प्रांतात इराणने चढविलेल्या या हल्ल्यांवर पाश्चिमात्य देशांमधून प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या देशांनी रिव्होल्युशनरी गार्ड्सनी केलेल्या हल्ल्यांवर टीका केली.
गेल्या चार दिवसात इराणने इराकच्या कुर्दिस्तान प्रांतात दुसऱ्यांदा हल्ले चढविले. सोमवारीच इराणने कुर्दिस्तान प्रांतात तोफा तसेच कत्युशा रॉकेट्सचे हल्ले चढविले होते. यामध्ये इराकमधील १० हून अधिक जणांचा बळी गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. स्वतंत्र कुर्दिस्तान देशाची मागणी करणाऱ्या सशस्त्र कुर्द दहशतवादी संघटना आपल्या देशातील अस्थैर्यामागे असल्याचा आरोप इराणमधील माध्यमांनी केला होता. तर देशांतर्गत वादामध्ये इराण विनाकारण कुर्दांना लक्ष्य करीत असल्याची टीका इराकमधील कुर्द नेत्यांनी केली होती.