विरार – विरारमधल्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये रात्री तीन वाजता पेटलेल्या आगीत १४ रुग्ण दगावले आहेत. यामध्ये पाच महिलांचा समावेश आहे. या हॉस्पिटलच्या दुसर्या मजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागाच्या एसीच्या कॉन्प्रेसरमध्ये स्फोट झाल्याने ही आग पेटल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने या ठिकाणी धाव घेतली व ही आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
नाशिकमधल्या रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २९ रुग्णांचा बळी गेला होता. त्याला काही दिवस उलटत नाही तोच विरारमधील हॉस्पिटलमध्ये हा अपघात झाला आहे. कोरोनाच्या साथीचा फैलाव होत असताना, झालेल्या या दुर्घटनांमुळे रुग्णालयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये सुमारे ९० रुग्ण होते व यापैकी १७ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आगीच्या घटनेनंतर या रुग्णांना तातडीने दुसर्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.