लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनमध्ये चर्चेची 14 वी फेरी

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमधील चर्चेची 14 वी फेरी सुरू होत आहे. एलएसीवरील चुशूल मॉल्दो येथे ही चर्चा पार पडेल. या चर्चेकडून भारताला फार मोठ्या अपेक्षा असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र काही झाले तरी चीनवर विश्‍वास ठेवता येणार नाही, ही भावना भारताचे सरकार व लष्करामध्ये दृढ झालेली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या चर्चेच्या फेरीची माहिती येत असतानाच चीनच्या सरकारी माध्यमांकडून भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना झालेल्या कोरोनाच्या लागणीचा मुद्दा उपस्थित करून भारतीय लष्करात हा विषाणू पसरल्याचा दावा ठोकला आहे.

लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनमध्ये चर्चेची 14 वी फेरीबुधवारी सकाळी 9.30 वाजता उभय देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमधील चर्चेची सुरूवात होईल. याआधी चर्चेची 13 वी फेरी ऑक्टोबर महिन्यात पार पडली होती. यावेळी लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारतीय लष्कराने चीनला प्रस्ताव दिला होता. पण भारताचा प्रस्ताव अवास्तव व परिस्थितीशी सुसंगत नसल्याची प्रतिक्रिया चीनने दिली होती. तसेच भारत आपल्या क्षमतेपेक्षा खूपच मोठी मागणी करीत असल्याची शेरेबाजी चीनच्या सरकारी माध्यमांनी केली होती. त्यामुळे चर्चेची ही 13 फेरी निष्फळ ठरली.

बुधवारपासून सुरू होत असलेल्या चर्चेच्या 14 व्या फेरीतूनही फारसे काही निष्पन्न होण्याची शक्यता नाही. गेल्या काही दिवसांपासून चीनने लडाखच्या एलएसीवर आपण वर्चस्व गाजवित असल्याचा आभास निर्माण केला होता. नव्या वर्षाच्या सुरूवातीला गलवानच्या खोऱ्यात चीनचा राष्ट्रध्वज फडकावण्यात आल्याचे दाखविणारे व्हिडिओज चीनच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते.

भारतीयांकडूनही याची दखल घेतली जाईल, याची तजवीज चीनने केली होती. हा चीनच्या मानसिक दबावतंत्राचा भाग असल्याचे उघड झाले होते. पण भारतीय लष्कराने गलवानच्या खोऱ्यात जिथे दोन्ही देशांच्या लष्कराची चकमक झाली होती, तिथले फोटोग्राफ्स प्रसिद्ध करून भारतीय सैनिक इथे तैनात असल्याचे दाखवून दिले होते.

यानंतर अस्वस्थ झालेल्या चीनच्या सरकारी माध्यमांनी भारताने युद्धज्वर पसरवू नये, असे आवाहन केले होते. त्यानंतरच्या काळातही चीनने भारताला चिथावणी देणाऱ्या कारवाया सुरू ठेवल्या होत्या. अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलून चीनने एलएसीवरील तणाव कायम ठेवला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. मात्र यामुळे भारताबरोबरील सीमावाद सोडविण्याबाबत तसेच एलएसीवरील तणाव कमी करण्याबाबत चीन गंभीर नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

या पार्श्‍वभूमीवर, पार पडत असलेल्या चर्चेच्ा 14 व्या फेरीतूनही फारसे काही हाती लागण्याची शक्यता नाही, हे आत्तापासूनच दिसू लागले आहे. चीनचे सरकारी दैनिक असलेल्या ग्लोबल टाईम्सचे माजी संपादक हू शिजिन यांनी भारताच्या संरक्षणमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे, याची माहिती सोशल मीडियावर देऊन याचा भारताच्या लष्करी क्षमतेशी संबंध जोडला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याने, भारतीय लष्करात हा विषाणू पसरल्याचे दिसते. यामुळे भारताच्या लष्करी क्षमतेवर फार मोठा परिणाम होईल, असा दावा शिजिन यांनी केला. अशा स्वरुपाचे हास्यास्पद दावे ठोकून चीन आपल्या जनतेसमोर भारतीय लष्कर दुबळे असल्याचा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे. लडाखच्या एलएसीवरील कडक हिवाळ्यात चिनी लष्कराच्या जवानांची बिकट अवस्था लक्षात घेता, भारतीय लष्कराच्या विरोधात असा खोटानाटा प्रचार करीत राहणे ही सध्या चीनची फार मोठी गरज बनलेली आहे.

leave a reply