एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये चर्चेची १५वी फेरी पार पडली

चर्चेची १५वी फेरीनवी दिल्ली/बीजिंग – लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनच्या लष्करामधील चर्चेची १५वी फेरीही पार पडली. या फेरीत सीमावाद सोडविण्यात यश मिळेल, असा विश्‍वास चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सदर चर्चेच्या आधी व्यक्त केला होता. मात्र संयुक्त निवेदनाखेरीज या चर्चेतून फारसे काही हाती लागलेले नाही. सध्या तरी सामोपचाराने हा वाद मिटविणे द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, यावर दोन्ही देशांचे एकमत झाल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते. याआधीच्या चर्चेनंतरही दोन्ही देशांनी जवळपास असेच संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले होते.

दोन दिवसांपूर्वीच, भारत व चीनमधील लडाखच्या एलएसीवरील वाद गेल्या चार दशकात नव्हता इतक्या प्रमाणात चिघळला आहे, असा दावा अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी केला होता. त्यापाठोपाठ भारत-चीन चर्चा सुरू असतानाही, एलएसीवरील वादात अमेरिका भारताला सहाय्य पुरवेल, असे अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक’ कमांडचे प्रमुख ऍडमिरल जॉन ऍक्विलिनो यांनी म्हटले होते. भारताचा चीनबरोबरील तणाव अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी उपकारक ठरेल व यामुळे भारत अमेरिकेबरोबरील सहकार्याला अधिक महत्त्व देईल, असे अमेरिकेला वाटत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, भारताला चीनपासून असलेल्या वाढत्या धोक्यासंदर्भात वक्तव्ये करीत आहे.

या पार्श्‍वभूमीवर भारत व चीनमधील सीमावादावरील चर्चेची १५वी फेरी सुरू झाली. चर्चेला सुरुवात होण्यापूर्वी, सीमावादाचा व्यापक द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होता कामा नये असे वक्तव्य चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी केले होते. तर दोन्ही देशांचे संबंध सुरळीत करायचे असल्यास सीमेवर शांतता व सौहार्द प्रस्थापित करावेच लागेल, याची जाणीव भारताने चीनला करून दिली होती. शुक्रवारी पार पडलेली चर्चा व दोन्ही देशांनी जारी केलेले संयुक्त निवेदन महत्त्वाचे ठरते. निवेदनात दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये अंतरिम सुरक्षा व स्थैयर्ताबाबत सहमती झाल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र हा वाद अधिक चिघळू द्यायचा नाही, यावर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांचे एकमत झाले असले, तरी लडाखच्या एलएसीवरून पूर्णपणे लष्करी माघार घेण्याच्या मुद्यावर दोन्ही देशांची सहमती झालेली नाही. तसे झाल्याखेरीज लडाखच्या एलएसीवरील तणाव निवळणार नाही. भारत सातत्याने चीनला याची जाणीव करून देत आहे.

leave a reply