आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या पुरात १६ जणांचा बळी

Assam-Floodदिसपूर – आसाममध्ये ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे आलेल्या पुरात १६ जणांचा बळी गेला आहे. आसामच्या या पुराचा ११६ जिल्ह्यांना फटका बसला असून यामुळे २.५३ लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. तसेच आसाममधली ११,७६५ हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरु करण्याचे आदेश दिले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफने बचावकार्य हाती घेतले असून हजारो जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

Assam-Floodगेल्या तीन चार दिवसांपासून आसाममध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. शुक्रवारच्या धुवांधार पावसानंतर आसाममध्ये सात जिल्ह्यात परिस्थिती अधिकच बिकट बनविली. अतिवृष्टीमुळे ब्रह्मपुत्रेला आलेल्या पुरात आतापर्यंत १६ जणांना या पुरात जीव गमवावा लागला आहे. अनेक घरे पाण्याखाली गेली असून रस्ते खचले आहेत. दळणवळण यंत्रणा कोलमडली आहे. तर आसामच्या काझीरंगा अभयारण्यात पाणी शिरले असून शेकडो प्राण्यांचा बळी गेला.

Assam-Floodया पुरामुळे यंत्रणेसमोरचे आव्हान वाढले आहे. त्यात कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे बचाव आणि मदतकार्यात अडथळे येत आहेत. तसेच आसामच्या ‘ऑईल इंडिया लिमिटेड’ला लागलेली आग अजूनही नियंत्रणात आलेली नाही. या पुराचा त्यालाही फटका बसला असून असून ऑईल डेपोमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

दरम्यान, येत्या पाच दिवसात आसाममध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्या महिन्यात आसामला पुराचा फटका बसला होता. आता चार आठवड्यानंतर पुन्हा आसामला पुराने वेढले आहे. यावेळची परिस्थिती गंभीर असल्याने यंत्रणेसमोरच्या चिंता वाढल्या आहेत.

leave a reply