लिमा – पेरूच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या समर्थकांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून सुरक्षा यंत्रणेशी झालेल्या आंदोलकांच्या संघर्षात 17 जणांचा बळी गेला. यावेळी निदर्शकांनी जुलियाका शहरातील विमानतळ तसेच पोलीस स्थानकांचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या या निदर्शनांमध्ये नव्या राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्याचबरोबर या सरकारविरोधी निदर्शकांना समर्थन देण्यासाठी बोलिव्हियाचे माजी राष्ट्राध्यक्ष इवो मोरालेस पेरूमध्ये प्रवेश मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या येत आहेत.
लॅटिन अमेरिकेतील पेरूमध्ये गेल्या आठवड्याभरापासून सरकारविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅसिलो यांच्या समर्थकांनी ही निदर्शने पुकारली आहेत. पेरूचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डिना बोलूआर्ते यांनी दगाबाजी करून सत्तेचा ताबा घेतल्याचा आरोप माजी राष्ट्राध्यक्ष पेड्रो आणि त्यांचे समर्थक करीत आहेत. पण राष्ट्राध्यक्ष बोलूआर्ते व सरकारमधील इतर नेत्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. याउलट पेड्रो आपल्यावरील आरोप लपविण्यासाठी हिंसक निदर्शनांचा वापर करीत असल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष बोलूआर्ते यांनी ठेवला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पेड्रो यांच्या सरकारविरोधात कटकारस्थान रचण्याचे आरोप झाले होते. पेड्रो यांनी राजीनामा देण्याची मागणी पेरूच्या विरोधी पक्षाकडून केली जात होती. पण राजीनामा देण्याऐवजी पेड्रो यांनी बेकायदेशीररित्या संसद बरखास्त करून देशावर एकहाती सत्ता गाजविण्याची तयारी केली होती, अशी टीका विरोधकांनी केली होती. गेल्या महिन्यात संसद बरखास्तीचे प्रयत्न उधळून लावण्यासाठी विरोधकांनी तातडीने पेड्रो यांच्याविरोधात महाभियोग चालवून सुरक्षा यंत्रणांचे सहाय्य घेऊन त्यांना अटक केली. त्यानंतर पेरूमध्ये बोलूआर्ते यांचे सरकार प्रस्थापित करण्यात आले.
पण राष्ट्राध्यक्ष पेड्रो यांच्यावरील कारवाई अयोग्य असल्याची टीका त्यांचे समर्थक करीत आहेत. त्याचबरोबर पेड्रो यांची सुटका करण्यात यावी आणि तातडीने देशात निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पेड्रो यांचे समर्थक करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, पेरूच्या पुनो प्रांतात निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. पण पहिले काही दिवस शांततेत सुरू असलेल्या या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले आहे. पेरूच्या सुरक्षा रक्षकांनी गेल्या चोवीस तासात केलेल्या कारवाईत 17 जणांचा बळी गेला तर 68 जण जखमी झाले आहेत.
पेरूचे पंतप्रधान अल्बर्टो ओतारोला यांनी दिलेल्या माहितीनुसार, निदर्शकांनी पुनो प्रांतातील जुलियाका शहरातील विमानतळाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तसेच येथील पोलीस स्थानकांवरही निदर्शकांनी हल्ले चढविले. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना या निदर्शकांवर कारवाई करावी लागल्याचे पंतप्रधान ओतारोला यांचे म्हणणे आहे. पेरूच्या पूर्वेकडे असलेल्या पुनो प्रांताची सीमारेषा बोलिव्हियाला जोडलेली आहे. त्यामुळे या सरकारविरोधी निदर्शनांची झळ बोलिव्हियाच्या सीमेलगतच्या गावांना देखील बसल्याचा दावा केला जातो.
दरम्यान, गेल्या दहा दिवसात राजकीय अस्थैर्याचा फटका बसलेला पेरू हा तिसरा लॅटिन अमेरिकन देश ठरतो. काही दिवसांपूर्वी मेक्सिकोमध्ये ड्रग माफिया रोटीनो गझमन याच्या अटकेनंतर लष्कर व माफिया टोळीत संघर्ष भडकला होता. यामुळे मेक्सिकोमध्ये गृहयुद्धासारखी स्थिती निर्माण झाली होती. तर ब्राझिलमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष लुला दा’सिल्वा यांच्याविरोधात माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी हिंसक निदर्शने पुकारली आहेत. बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी ब्राझिलच्या संसदेचा ताबा घेतला होता.