तेहरान – इराणच्या सिस्तान-बलोचिस्तान प्रांतात हिजाबविरोधी आंदोलनादरम्यान पेटलेल्या संघर्षात 19 जण ठार झाले. यामध्ये स्थानिकांबरोबरच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. रिव्होल्युशनरी गार्ड्ससाठी हा मोठा हादरा ठरतो. देशातील या दहशतवादी हल्ल्यांसाठी अमेरिका, ब्रिटन जबाबदार असल्याचा आरोप करून इराणने नऊ युरोपिय नागरिकांना अटक केली आहे.
माहसा अमिनी या कुर्द तरुणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर इराणमध्ये राजवटविरोधी आंदोलनाचा भडका उडाला आहे. इराणच्या दूरवरील शहरांमध्ये देखील राजवट तसेच हिजाबविरोधी आंदोलन सुरू असून सिस्तान-बलोचिस्तान हा दुर्गम प्रांत देखील याला अपवाद राहिलेला नाही. इराणमधील उपेक्षित प्रांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिस्तान-बलोचिस्तान प्रांताची राजधानी झाहेदान येथे हे आंदोलन सुरू होते. यावेळी काही संशयितांनी येथील पोलीस स्टेशनवर हल्ला चढविला. प्रत्युत्तरादाखल पोलीस व रिव्होल्युशनरी गार्ड्सनी गोळीबार केला. यानंतर रिव्होल्युशनरी गार्ड्स व आंदोलकांमध्ये पेटलेल्या संघर्षात 19 जणांचा बळी गेला. आंदोलकांव्यतिरिक्त यामध्ये रिव्होल्युशनरी गार्ड्सचा स्थानिक कमांडर कर्नल सईद अली मुसावी ठार झाल्याचे स्थानिक वृत्तवाहिन्यांनी सांगितले. तसेच काही पोलीस जवान जखमी झाले.
इराणमधील आंदोलनात झालेल्या हिंसाचारात एवढ्या मोठ्या पदावरचा अधिकारी ठार झाल्यामुळे रिव्होल्युशनरी गार्ड्सला हादरा बसल्याचे स्थानिक वृत्तवाहिन्यांचे म्हणणे आहे. पण सिस्तान-बलोचिस्तान प्रांतातील संघर्षात इराणच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख अली मुसावी ठार झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. इराणच्या सरकारने या बातमीला दुजोरा दिलेला नाही. पण पुढच्या काही तासात रिव्होल्युशनरी गार्ड्सनी वेगवेगळ्या शहरातून आठ युरोपिय नागरिकांना ताब्यात घेतले.
गेल्या दोन आठवड्यांपासून इराणला अस्थिर करणाऱ्या या हिंसक आंदोलनाला सदर युरोपिय नागरिक सहाय्य करीत असल्याचे इराणने म्हटले आहे. यामध्ये जर्मनी, पोलंड, इटली, फ्रान्स, नेदरलँड्स, स्वीडन आणि काही देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. इराणच्या राजवटीला लक्ष्य करून केलेल्या या दहशतवादी हल्ल्यामागे अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप इराणचे नेते करीत आहेत.