नवी दिल्ली – सुदानमधून सुमारे 278 भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे. नौदलाचे आयएनएस सुमेधा हे जहाज या 278 जणांना घेऊन सौदी अरेबियाच्या जेद्दाह बंदरात दाखल होत असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. अंतर्गत संघर्षात होरपळत असलेल्या सुदानमधून भारतीयांची ही पहिली बॅच बाहेर पडली असून यानंतर अधिक भारतीयांना सुदानबाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सुदानमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांची संख्या तीन हजारांवर असल्याचे सांगितले जाते.
सुदानच्या विविध भागात असलेल्या भारतीयांना पोर्ट सुदानपर्यंत आणण्यासाठी भारत प्र्रयत्न करीत आहे. सोमवारपर्यंत सुमारे पाचशे भारतीय पोर्ट सुदानपर्यंत आले होते. यापैकी 278 जणांना पोर्ट सुदानमधून ‘आयएनएस सुमेधा’द्वारे सौदीच्या जेद्दाह इथे पोहोचविण्यात येत आहे. इथून त्यांना मायदेशी आणण्यात येईल. यासाठी भारतीय वायुसेनेची विमाने आधीच सौदीमध्ये दाखल झालेली आहेत. ‘आयएनएस सुमेधा’च्या पाठोपाठ ‘आयएनएस तेग’ हे जहाज देखील सुदानच्या बंदरात दाखल झाले आहे. यामुळे सुदानमधून अधिक जलदगतीने भारतीयांना बाहेर काढता येऊ शकेल.
भारतीयांना बाहेर काढण्याच्या कार्यात सौदी अरेबिया व फ्रान्स हे देश भारताला सहकार्य करीत आहेत. त्याचवेळी सुदानमधून भारतीयांना परत आणण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन कावेरी’च्या अंतर्गत सुदानमधील श्रीलंकन नागरिकांनाही बाहेर काढण्याचा प्रस्ताव भारताने दिला होता. याचे श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्वागत केले असून यासाठी भारताचे आभार मानले आहेत. दरम्यान, सुदानमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांना बाहेर पडण्यासाठी लष्कर व निमलष्करी दलामध्ये 72 तासांची संघर्षबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे सुदानमधून भारत तसेच इतर देशांच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
संघर्षबंदीच्या काळातही सुदानमध्ये काही ठिकाणी रक्तपात झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे आपले वास्तव्य असलेल्या ठिकाणापासून विमानतळ किंवा बंदर गाठणे सुदानमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांसाठी अवघड बनले आहे. तरीही या नागरिकांच्या सुखरूप सुटकेसाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन यासाठी प्रयत्न केले असून सौदी अरेबिया यात आघाडीवर असल्याचे दिसत आहे.