अल रॅटोनच्या अटकेनंतर मेक्सिकोमध्ये पेटलेल्या ड्रग वॉरमध्ये 29 ठार

mexico el-chapo-son violenceमेक्सिको सिटी – जगभरातील अमली पदार्थांच्या तस्करीतील सर्वात मोठे नाव असलेल्या, ‘अल चॅपो’च्या मुलाला झालेल्या अटकेनंतर मेक्सिकोमध्ये पेटलेल्या संघर्षात 29 जण ठार झाले. यामध्ये मेक्सिकन लष्कराचे दहा जवान तर या टोळीच्या 19 सदस्यांचा समावेश आहे. यानंतर मेक्सिकोच्या इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ सुरू झाली असून रस्त्यांवर लष्कराला तैनात करण्यात आले आहे. यावरुन अल चॅपोची टोळी अजूनही मेक्सिको व शेजारच्या देशांमध्ये आपला प्रभाव ठेवून असल्याचे उघड होत आहे. जोअक्विन गझमन उर्फ अल चॅपो याचे मेक्सिकोच्या सिनालोआ प्रांतात अमली पदार्थांचे मोठे नेटवर्क आहे. जगभरात ‘सिनालोआ कार्टल’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही टोळी अमेरिकेतील 25 टक्के अमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण ठेवून आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या अमली पदार्थांच्या तस्करीतून सिनालोआ कार्टल वर्षाला तीन अब्ज डॉलर्सची कमाई करते. या जोरावर अल चॅपोने मेक्सिकोमध्ये स्वत:चे वेगळे लष्कर उभारले आहे.

mexico el-chapo-son2016 साली अल चॅपोला अटक झाल्यानंतर सिनालोआ कार्टल कोसळेल, असा दावा केला जात होता. पण अल चॅपोचा मुलगा ‘अल रॅटोन’ उर्फ ‘द माऊस’ याने या टोळीचा पूर्ण ताबा घेतला. गेल्या दोन वर्षात जगभरात कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोसळत असताना सिनालोआ कार्टलने मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यापार केल्याचा दावा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून अल रॅटोन मेक्सिको तसेच अमेरिकेच्या निशाण्यावर असल्याचा दावा केला जातो.

रॅटोनविरोधी कारवाई करण्याआधी मेक्सिकोच्या सरकारने सिनालोआ प्रांतासह देशातील इतर शहरांमधील सुरक्षा व्यवस्था चोख केली होती. गुरुवारी रॅटोनला अटक केल्यानंतर सिनालोआ प्रांतातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अल चॅपोच्या टोळीने मेक्सिकोच्या लष्करावरच हल्ले सुरू केले. सिनालोआची राजधानी कुलियाकान शहरात मोठा संघर्ष भडकला होता. यामध्ये 10 जवानांचा तर सिनालोआ कार्टलचे 19 तस्कर ठार झाले.

या संघर्षानंतर कॅनडाने आपल्या नागरिकांना सिनालोआपासून दूर राहण्याची सूचना केली आहे. तर अमेरिकेने रॅटोनच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. पण मेक्सिको अमेरिकेची ही मागणी फेटाळेल, असा दावा केला जातो.

leave a reply