नवी दिल्ली – जगभरात कोरोनाव्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो भारतीय निरनिराळया देशात अडकून पडले आहेत. संयुक्त अरब ईमिरात ( युएई ) आणि इतर आखाती देशातही हजारो भारतीय अडकून पडले असून त्यांनी माघारी येण्यासाठी नोंदणी केली आहे. या भरतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या तीन युद्धनौका रवाना करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरी नंतर तातडीने या युद्धनौका रवाना करण्यात येतील.
‘युएई ‘सह अन्य देशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी नौदलाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तीन युद्धनौकांच्या सहाय्याने किमान १५०० भारतीयांना मायदेशी आणण्यात येईल असे नौदलाने म्हटले आहे. नौदलाने त्यासाठी एक योजना आखली आहे. त्यानुसार “आयएनएस जलाश्व’ युद्ध नौका भारतीयांना आणण्यासाठी रवाना करण्यात येईल. या युद्धनौकेवर कर्मचाऱ्यांसह एक हजार जवान राहू शकतात. तर सोशल डिस्टंसिंंगचा विचार करता ८५० जाण राहू शकतील असे सांगण्यात येत आहे . “आयएनएस जलाश्व’ सह कुंभीर श्रेणीच्या दोन युद्ध नौका देखील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत.
लवकरच या युद्धनौका पाठविण्यात येणार आहेत. देशातील वेगवेगळ्या बंदरात युद्धनौका असून त्यांना आखातात पोहोचण्यासाठी चार ते पाच दिवस लागतील. कोणत्या बंदरातून या युद्धनौका रवाना करण्यात येणार आहेत त्यावर भारतीय मायदेशी कधी येतील हे अवलंबून आहे. ३ ते ४ मे रोजी या युद्धनौका भारतीयांना घेऊन निघाल्यास पुढील तीन ते चार दिवसात त्या माघारी येतील.
सरकारकडून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. कामाचा परवाना संपलेले, नोकरी गमवावी लागलेल्या आणि अन्य अत्यावश्यक कारणे असलेल्या भारतीयांना प्रथम आणण्यात येणार आहे. दक्षिण-पूर्व आशिया, मध्य आशिया, युरोप आणि अमेरिकेत सुमारे ८० लाख नागरिक आहेत. ज्या नागरिकांना त्वरित परत आणणे आवश्यक आहे त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
दरम्यान मायदेशी परतण्यासाठी “युएई” मध्ये नोंदणी करण्यात येत असून काही तासातच हजारो नागरिकांनी आपली नावे दिली आहेत. “युएई” मध्ये राहणाऱ्या केरळ मधील २.२० लाख नागरिकांनी सोमवारी आपली नावे नोंदवली.