इस्तंबूल – इराक आणि सिरियातील कुर्दांच्या ठिकाणांवर चढविलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 30 कुर्द दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा तुर्कीने केला. यासाठी लढाऊ विमाने आणि ड्रोन्सचा वापर केल्याचे तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. स्वतंत्र कुर्दिस्तानची मागणी करणाऱ्या इराक, सिरिया व तुर्कीतील सर्व कुर्द गटांना एर्दोगन राजवटीने दहशतवादी घोषित केले आहे.
तुर्कीच्या एफ-16 लढाऊ विमानांनी इराकची सीमा ओलांडून 140 किलोमीटर आत हे हल्ले चढविल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. यावेळी इराकमधील 16 ठिकाणांना लक्ष्य करून या कारवाईत 23 दहशतवाद्यांना मारल्याचे तुर्कीने जाहीर केले. तर सिरियाच्या कुर्द भागात चढविलेल्या हल्ल्यात सात जण मारले गेल्याचे तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. दोन्ही देशांमधील कारवाईत ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी-पीकेके’चे दहशतवादी मारल्याचा दावा तुर्की करीत आहे.
गेल्या काही दिवसांपासून तुर्की इराक, सिरियातील कुर्द गटांवरील आपले हल्ले तीव्र केले आहेत. तुर्कीच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणाऱ्या कुर्द बंडखोरांवर हल्ले चढवित असल्याचा खुलासा तुर्की देत आहे. पण तुर्की हवाई हल्ल्यांमध्ये निरपराध नागरिकांचा देखील बळी घेत असल्याची टीका होत आहे.