गुरुदासपूर, दि. १९ (वृत्तसंस्था) – रविवारी पहाटे पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर ‘सीमा सुरक्षा दला’ने(बीएसएफ) अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. सुमारे ३०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आल्याची माहिती ‘बीएसएफ’ने दिली आहे.
पंजाबमधील भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळील रावी नदीतून या हेरॉईनची तस्करी केली जात होती. एका पिशवीतून दोरीच्या सहाय्याने हे अमली पदार्थ तस्करांकडून भारतीय सीमेत पाठविले जात असताना ‘बीएसएफ’च्या अधिकाऱ्यांना संशयित हालचाली दिसल्या. त्यानंतर लागलीच कारवाई करीत हे हेरॉईन जप्त करण्यात आले. अंधाराचा फायदा घेत तस्करांनी येथून पळ काढला असला, तरी तस्कर याच भागात लपून बसल्याचा संशय आहे. त्यामुळे व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पाकिस्तानातून अमली पदार्थांची तस्करीत वाढ झाली आहे. कोरोनाचे संकट असतानाही पाकिस्तानातून अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रयत्न सतत चालू आहेत. तीन आठवड्यांपूर्वी बीएसएफने भारत पाकिस्तानच्या सीमेवरुन चार किलोचे हेरॉईन जप्त केले होते. तर जून महिन्यात भारत पाकिस्तानच्या सीमेवरुन सात किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील याची किंमत ३५ कोटी रुपये इतकी होती. या प्रकरणी चारजणांना अटक करण्यात आली होती.
पाकिस्तानातून होणाऱ्या या अमली पदार्थांच्या तस्करीचा ‘टेरर फंडिंग’शी ही संबंध असल्याचे याआधी उघड झाले आहे. या तस्करीतून मिळणार पैसा हा दहशतवाद्यांना आणि फुटीर गटांना सहाय्यासाठी वापरला जातो. सीमेवर सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आल्यावर भूमार्गाने तस्करीत होणारे अडथळे पाहता, सागरी मार्गाने तस्करीचे प्रयत्न वाढले आहेत. गेल्यावर्षी सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ तटरक्षक दलांच्या निरनिराळ्या कारवाईत पकडण्यात आले होते.
एका अहवालानुसार, या वर्षात पहिल्या सहा महिन्यातच बीएसएफने सीमेवर ६,८८६ किलोचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. आंतराष्ट्रीय बाजारात याची किंमत अब्जावधी रुपये आहे. ‘बीएसएफ’चे जवान भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असतात. यातील पाकिस्तान सीमेवरच सर्वाधिक अमली पदार्थ पकडण्यात आले आहेत. यामध्ये हेरॉईन, हशिश, गांजा व इतर अमली पदार्थांचा समावेश आहे. २०१९ सालाच्या तुलनेत यावर्षी भारत-पाकिस्तान व भारत-बांगलादेश सीमेवरून अमली पदार्थांच्या तस्करीत ४७ टक्क्यांची वाढ झाली आहे.