काश्मीरच्या नियंत्रण रेषेपलीकडे ३०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत – ‘बीएसएफ’चे अतिरिक्त महासंचालक सुरेंद्र पवार

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेपलीकडील लाँच पॅड्सवर सुमारे २५० ते ३०० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत असल्याचे सीमा सुरक्षादलाचे अतिरिक्त (बीएसएफ) महासंचालक सुरेंद्र पवार यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टीपूर्वी या दहशतवाद्यांना भारतीय सीमेत घुसविण्यासाठी पाकिस्तान आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र हे डाव उधळण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी माछिल सेक्टरमध्ये घुखोरीचा मोठा प्रयत्न उधळण्यात आला होता.यावेळी झालेल्या संघर्षात लष्कराच्या अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले होते.

घुसखोरीच्या तयारीत

यावर्षी दहशतवाद्यांच्या घुसखोरीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यावर्षी आतापर्यंत केवळ २५ ते ३० दहशतवादी घुसखोरी करण्यास यशस्वी ठरले. गेल्यावर्षी १४९ दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती. सुक्षादलांकडून पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांचे घुसखोरीचे डाव हाणून पाडण्यात येत आहेत. यामुळे घुसखोरी घटल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

सध्या लाँच पॅड्सवर सुमारे २५० ते ३०० दहशतवादी असून हिमवृष्टी सुरु होण्यापूर्वी भारतात घुसखोरीच्या तयारीत आहेत. मात्र दहशतवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यात येतील, असे बीएसएफच्या अतिरिक्त महासंचालकांनी ठणकावून सांगितले. यावेळी पवार यांनी माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांबरोबर चकमकीत वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

leave a reply