काबुल – गेल्या चोवीस तासात अफगाणिस्तानात लष्कर आणि तालिबानी दहशतवाद्यांमध्ये पेटलेल्या संघर्षात ३१ जण ठार झाले. यात तालिबानच्या २१ दहशतवाद्यांसह अफगाणी लष्कराच्या १० जवानांचा देखील समावेश आहे. दरम्यान, मे महिन्याच्या डेडलाईननंतरही अमेरिकेने अफगाणिस्तानात सैन्य तैनात ठेवावे, असे आवाहन अमेरिकेतील अभ्यासगटाने आपल्या अहवालात केले आहे.
अफगाणी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, उरूझ्गन आणि सर-ए-पूल या दोन प्रांतात तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणी सुरक्षा रक्षकांना लक्ष्य केले. तालिबानच्या हल्ल्यात अफगाणी लष्कराच्या १० जवानांचा बळी गेला तर ११ जण जखमी झाले. अफगाणी लष्कराने यावेळी दिलेल्या प्रत्युुत्तरात तालिबानचे सहा दहशतवादी देखील मारले गेले. या घटनेला काही तास उलटत नाही तोच तालिबानने कंदहार प्रांतातील अफगाणी लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करण्याची योजना आखली होती.
कंदहार प्रांतातील अरघनाबाद आणि दांद या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने घुसखोरी करून तालिबानने हल्ल्याची तयारी केली होती. पण सावध असलेल्या अफगाणी सुरक्षा यंत्रणेने केलेल्या कारवाईत १५ तालिबानींना ठार करण्यात आले. अफगाणी लष्कराच्या कारवाईने तालिबानचे मनसुबे उधळून लावले. या कारवाईत अफगाणी लष्कराने मोठा शस्त्रसाठा जप्त केला असून यामध्ये स्फोटकांनी भरलेल्या दोन मोटारी आणि चार मोटारसायकलींचा समावेश आहे.
अमेरिका आणि अफगाणिस्तानातील सरकारबरोबर वाटाघाटी सुरू करण्याच्या आड तालिबानने येथील दहशतवादी हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. तालिबानने अफगाणिस्तानचे नेते, प्रशासकीय अधिकारी जवानांना सर्वाधिक लक्ष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘स्पेशल इन्स्पेक्टर जनरल फॉर अफगाणिस्तान रिकन्स्ट्रक्शन’ (सिगार) या अभ्यासगटाने अहवालाद्वारे ही बाब निदर्शनास आणून दिली होती. गेल्या वर्षी १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर, या तीन महिन्यांच्या कालावधीत तालिबानच्या हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानात ८१० जणांचा बळी गेला होता.
दरम्यान, अमेरिकेच्या काँग्रेसने नेमलेल्या ‘अफगाणिस्तान स्टडी ग्रुप’ गटाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात बायडेन प्रशासनाला आवाहन केले आहे. मे महिन्यानंतरही अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्यमाघारी घेऊ नये, असे या गटाने म्हटले आहे. अमेरिकेच्या सैन्यमाघारीमुळे अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवाया अधिक तीव्र होतील, अशी चिंता या गटाने व्यक्त केली आहे.