किंशासा – डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोतील सोन्याच्या खाणीवर सशस्त्र गटाने चढविलेल्या हल्ल्यात 35 जणांचा बळी गेला. यामध्ये चार महिन्याच्या मुलाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. ही प्राथमिक माहिती असून या हल्ल्यात किमान 50 जणांचा बळी गेला असावाआणि 100 जण बेपत्ता असल्याचा दावा स्थानिक नेत्याने केला.
दोन दिवसांपूर्वी काँगोच्या ईशान्येकडील इतूरी प्रांतातील मुंगवालू भागातील सोन्याच्या खाणीवर बंदूकधारी हल्लेखोरांनी भीषण गोळीबार केला. सोन्याच्या खाणीच्या आवारात दिसणाऱ्या प्रत्येकावर या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. तर काही जणांना जिवंत जाळण्याचे भयंकर प्रकारही घडल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्याने दिली.
या ठिकाणाहून 29 जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तर सहा जणांचा इथे आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे उघड झाले. तसेच सोन्याच्या खाणीमध्ये आणखी काही मृतदेह असल्याची शक्यता वर्तविण्यात येते.
या भीषण हत्याकांडासाठी ‘कोडेको’ या सशस्त्र गटावर संशय व्यक्त केला जातो. हा गट वांशिक संघर्षातून उभा राहिला आहे. गेली काही वर्षे लुटमारीच्या उद्देशाने कोडेको गटाने स्थानिक तसेच परदेशी मानवाधिकार संघटनांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले चढविले होते.
1999 ते 2003 या कालावधीत या गटाच्या हिंसाचारात हजारो जणांचा बळी गेला होता. पण फ्रान्सच्या नेतृत्वाखाली युरोपिय देशांच्या लष्करी आघाडीचे जवान या भागात तैनात झाल्यानंतर कोडेकोचे हल्ले कमी झाले होते. इतूरी हा काँगोतील सोन्याने समृद्ध असलेला प्रांत म्हणून ओळखला जातो.