तिगरे – इथिओपियाच्या लष्कराने निर्वासितांच्या छावणीवर चढविलेल्या हवाईहल्ल्यात 56 नागरिकांचा बळी गेला आहे. तिगरे प्रांतातील बंडखोर गटांनी यासंदर्भातील माहिती दिली. या हल्ल्यामुळे इथिओपियाच्या लष्कराने आपली कारवाई अद्याप थांबविली नसल्याचे उघड झाले आहे. इथिओपियाचे पंतप्रधान अबि अहमद यांनी शुक्रवारी सलोख्याचा संदेश जारी केला होता. या पार्श्वभूमीवर हा हल्ला लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.
तिगरे प्रांतात वायव्येकडे असलेल्या देदेबितमध्ये असलेल्या निर्वासितांच्या छावणीवर ड्रोनहल्ले झाल्याचा दावा तिगरेतील बंडखोर गटांनी केला. या हल्ल्यात 56 निर्वासितांचा बळी गेला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. इथिओपियाच्या लष्कराने या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या हल्ल्यामुळे इथिओपियातील संघर्ष अद्याप संपला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
2020 साली नोव्हेंबर महिन्यात इथिओपियाचे पंतप्रधान अबि अहमद यांनी तिगरे प्रांतावर हल्ला चढविला होता. या कारवाईसाठी त्यांनी शेजारी देश इरिट्रिआचेही सहाय्य घेतले होते. काही महिन्यांच्या संघर्षानंतर पंतप्रधान अहमद यांनी तिगरे प्रांतावर ताबा मिळविल्याचा दावा केला होता. मात्र त्यांचा हा दावा फोल असल्याचे गेल्या वर्षी नव्याने भडकलेल्या संघर्षातून समोर आले होते. तिगरेतील स्थानिक बंडखोर गटांनी राजधानी मेकेलसह प्रांतातील महत्त्वाची शहरे ताब्यात घेण्यात यश मिळविले होते. त्यानंतर राजधानी आदिसअबाबावर ताबा मिळविण्याचाही इशारा देण्यात आला होता.
मात्र गेल्या दोन महिन्यात युद्धाचे पारडे पुन्हा फिरले असून तिगरे बंडखोरांना माघार घेणे भाग पडले आहे. यामागे ड्रोन्सच्या सहाय्याने चढविलेले आक्रमक हल्ले हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. इथिओपियन सरकारने तुर्कीकडून मोठ्या प्रमाणात ड्रोन्स खरेदी केल्याचे काही महिन्यांपूर्वी समोर आले होते.