महाराष्ट्रात दोन दिवसात कोरोनाचे ७२ हजार नवे रुग्ण

- औरंगाबादमध्ये ९ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

नवी दिल्ली/मुंबई – महाराष्ट्रात दोन दिवसात कोरोनाचे ७२ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच २१५ जणांचा या साथीने मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाच्या ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ३ लाख ३६ हजारांवर पोहोचली आतापर्यंत या साथीमुळे राज्यातील बळींची संख्या ५४ हजारांच्या पुढे गेली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात नियम येत्या काही दिवसात आणखी कठोर होतील, असे संकेत वारंवार मिळत आहेत. नागपूर, नांदेड, बीड पाठोपाठ औरंगाबादमध्येही लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मार्चपासून ९ एप्रिलपर्यंत येथे लॉकडाऊन असेल.

सोमवारी महाराष्ट्रात ३१ हजार ६४३ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली, तसेच १०२ जण या साथीने दगावले. रविवारसह त्याआधीच्या तीन दिवसांच्या तुलनेत सोमवारी नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली. मात्र कोरोना चाचण्याही कमी झाल्याने ही घट दिसत असल्याचे म्हटले जाते. रविवारी महाराष्ट्रात ४० हजार ४१४ नवे रुग्ण सापडले होते, तसेच १०८ जणांचा बळी गेला होता. त्याआधी सलग तीन दिवस ३५ ते ३७ हजार नवे रुग्ण राज्यात आढळले होते. महाराष्ट्रात सातत्याने मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने रिकव्हरी रेट अर्थात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ८५.७१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

सोमवारी मुंबईत ५,८८८ नवे रुग्ण सापडले, तसेच १२ जणांचा बळी गेला. रविवारी मुंबईत ६,९३३ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तसेच शनिवारीही ६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले होते. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये ८२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे चाचण्यांमधून लाक्षात आले आहे. यानंतर ताज हॉटेल तीन दिवसांसाठी सील करण्यात निर्णय पालिकेने घेतला. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, विरार-वसई, मीरा भाईंदर, पनवेल, रायगड या आसपासच्या क्षेत्रात मिळून सोमवारी चोवीस तासात १०१८१ नवे रुग्ण आढळले आहेत, तर रविवारी १२३१९ नव्या रुग्णांची नोंद झाली होती.

पुणे मंडळात ५८८५, नाशिक मंडळामध्ये ५६५८, नागपूर मंडळामध्ये ३,६६४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. औरंगाबाद परिमंडळात १६३५, लातूर मंडळात २११८, अकोला परिमंडळात कोरोनाचे १७४७ नवे रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, सोमवारी केंद्र सरकारने पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असलेल्या राज्यांमध्ये उपयोजना कडक करण्याच्या सूचना दिल्या. कंटेन्मेंट झोन आणि टेस्टिंग व ट्रेसिंगवर भर देण्यास सांगितले. रविवारपासून सोमवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशात ६८ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली होती, तसेच २९१ जण दगावले होते. सध्या देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक तिव्र आहे. या लाटेत कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग ३०० टक्के अधिक वेगाने होत असल्याचा दावा, संशोधकांच्या हवाल्याने एका वृत्तात करण्यात आला आहे. त्यामुळे ही लाट वेळीच थोपविली नाही, तर रुग्ण संख्या भरसाठ वाढेल अशी भिती व्यक्त केली जाते.

leave a reply