काश्मीरमध्ये चोवीस तासात नऊ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीर – गेल्या चोवीस तासात काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी नऊ दहशतवाद्यांना ठार केले. रविवारी केरन सेक्टरमध्ये सुरक्षादलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. या चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाला. याआधी शनिवारी कुलगाममध्ये ‘हिजबुल मुजाहिद्दीन’च्या चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते. रविवारी केरण सेक्टर येथील नियंत्रण रेषेवरून दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचे सुरक्षा दलाच्या जवानाच्या लक्षात आले. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षादलाच्या जवानांनामध्ये चकमक उडाली. या चकमकीत ५ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. चकमकीत एक जवान शहीद झाला असून दोन जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती संरक्षणमंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली. शनिवारी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षादलाचे जवान दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत ‘हिजबुल मुजाहिदीन’च्या चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते. त्याआधी शुक्रवारी सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ‘लश्कर -ए-तोयबा’च्या चार दहशतवाद्यांना आणि पाच हस्तकांना अटक करण्यात आली होती. २४ तासात ९ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले असून चार दहशतवाद्यांसह ९ जणांना अटक झाली आहे.

काश्मीरमधून दहशतवाद्यांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी सुरक्षादलांकडून मोहीम सुरु आहे. या मोहिमेमुळे दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील काही भागात अडकून पडले आहेत. त्यांना साहाय्य करणाऱ्या हस्तकांचे जाळेही सुरक्षादलांनी उद्वस्थ केल्याने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले आहे. मात्र पाकिस्तान पुरस्कृत या दहशतवादी संघटनांकडून मोठ्या हल्ल्याचे कट सतत आखले जात आहेत. त्याचवेळी दहशतवाद्यांना घुसखोरीस साहाय्य करण्यासाठी पाकिस्तानकडून भारतीय लष्कराच्या चौक्यांवर सतत गोळीबार सुरु आहे. मात्र पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवादी संघटनांचे हे सारे मनसुबे भारतीय सुरक्षादलांकडून उधळले जात आहेत. सीमेवर पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

१५ मार्च रोजी अनंतनागमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबाच्या चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते. याचबरोबर ९ मार्च रोजी शोपियन जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांनी उडालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते.

leave a reply