येत्या सहा वर्षात परग्रहवासिय पृथ्वीशी संपर्क साधतील

- अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांचा दावा

परग्रहवासियवॉशिंग्टन – येत्या सहा वर्षात परग्रहवासिय पृथ्वीशी संपर्क साधू शकतात असा दावा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी केला. 2002 साली अमेरिकी अंतराळसंस्था नासाने ‘पायोनिअर 12’ या अंतराळयानाला पाठविलेला संदेश पृथ्वीपासून 27 प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या एका ताऱ्यापर्यंतही पोहोचला होता आणि हाच संदेश परग्रहवासियांकडून ‘इंटरसेप्ट’ झाला असल्याची शक्यता कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केली आहे. जानेवारी महिन्यात अमेरिकेतील एका टास्क फोर्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालात उडत्या तबकड्या आढळण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती देण्यात आली होती. हे वाढते प्रमाण परग्रहवासियांच्या हालचालींशी संबंधित असू शकते, असे दावेही करण्यात आले होते.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक हॉवर्ड आयझॅक्सन व त्यांच्या सहकाऱ्यांनी नासाच्या ‘डीप स्टेशन नेटवर्क’कडून विविध अंतराळयानांना पाठविण्यात येणाऱ्या संदेशांचा अभ्यास केला. यात ‘व्हॉयेजर 1’, ‘व्हॉयेजर 2’, ‘पायोनिअर 10’, ‘पायोनिअर 11’ व ‘न्यू होरायझन्स’ यासारख्या अंतराळयानांचा समावेश आहे. नासाच्या ‘डीप स्टेशन नेटवर्क’मधून यानाशी संपर्क प्रस्थापित करणारे संदेश नियमितपणे पाठविण्यात येतात. रेडिओलहरींच्या सहाय्याने पाठविण्यात येणारे हे संदेश त्या अंतराळयानांबरोबरच विश्वातील इतर घटकांपर्यंतही जाऊन पोहोचतात.

परग्रहवासिय‘जर्नल ऑफ द पब्लिकेशन्स ऑफ द ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या लेखात, ‘व्हॉयेजर 2’, ‘पायोनिअर 10’, ‘पायोनिअर 11’ या अंतराळयानांना पाठविलेले संदेश किमान एका ताऱ्यापर्यंत पोहोचले असावेत, असे संशोधकांनी म्हटले आहे. या विविध संदेशांपैकी एखाद्या संदेशाला प्रतिसाद मिळू शकतो व अंदाजे 2029 सालापर्यंत परग्रहवासियांकडून संदेश येण्याची शक्यता कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी व्यक्त केली.

यावेळी आयझॅक्सन यांनी कार्ल सॅगन या लेखकाचाही उल्लेख केला. अंतराळात संदेश पाठविण्याची कल्पना सॅगन यांच्याकडून मांडण्यात आली होती, असे आयझॅक्सन यांनी नमूद केले. कार्ल सॅगन यांनी या कल्पनेवर एक कथा लिहिली होती. 1997 साली हॉलिवूडमध्ये आलेल्या ‘कॉन्टॅक्ट’ या चित्रपटासाठी या कथेचा आधार घेण्यात आला होता. यात परग्रहवासियांवर अभ्यास करणारी एक संशोधक पृथ्वीपासून 25 प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या एका ग्रहाला संदेश पाठविण्याचा निर्णय घेते, असे दाखविण्यात आले होते.

गेल्या काही वर्षात अमेरिकी यंत्रणांसह प्रसारमाध्यमे व सोशल मीडियातून परग्रहवासियांबाबत मोठ्या प्रमाणात माहिती प्रसिद्ध होत आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात चीनमधील रेडिओ टेलिस्कोपने परग्रहवासियांचे संदेश पकडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. तर 2020 साली इस्रायलचे माजी ‘स्पेस सिक्युरिटी चीफ’ हैम एशेद यांनी, मानवाने विश्वातील परग्रहवासियांशी संपर्क साधलेला आहे, असा खळबळजनक दावा केला होता. मात्र ही बाब स्वीकारण्यास मानवजात अद्याप तयार नसल्याने ती गोपनीय ठेवण्यात आली असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

leave a reply