न्यूयॉर्क – कोरोनाव्हायरसने अमेरिकेत दगावलेल्यांची संख्या २४९० वर पोहोचली आहे. न्यूयॉर्क प्रांतात या साथीचे सर्वाधिक बळी गेले आहेत. इथल्या प्रगत आरोग्य यंत्रणांवरही याचा जबरदस्त ताण आला असून हॉस्पिटल भरुन गेल्याने मोकळ्या मैदानांमध्ये इमर्जन्सी हॉस्पिटल्स उभारण्यात येत आहेत.
गेल्या चोवीस तासात अमेरिकेत २५४ जणांचा बळी गेला आहे. तर या देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १,४२,७९३ वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात १८ हजार नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या तपासणीच्या आधारावर ही माहिती जाहीर केली असून खासगी रुग्णालयांकडील माहितीचे संकलन होणे बाकी असल्याचे अमेरिकी अधिकार्यांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात या साथीत दगावलेल्यांची आणि रुग्णांची संख्या भयावहरित्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते.
अमेरिकेतील न्यूयॉर्क प्रांतात या साथीने एक हजाराहून अधिक जणांचा बळी घेतला असून येथील रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात (आयसीयू) जागा उरलेली नाही. म्हणून येथील मोकळ्या मैदानांमध्ये फक्त ‘आयसीयू’ची सोय असलेली रुग्णालये उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. तर या साथीव्यतिरीक्त अन्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी अमेरिकेची ‘कम्फर्ट’ ही हॉस्पिटल शिप लवकरच न्यूयॉर्कच्या किनार्यावर दाखल होणार आहे.
दरम्यान, या साथीचे थैमान आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे अमेरिकेच्या बाजारातील इंधनाचे दर २० डॉलर्स प्रति बॅरेलच्याही खाली उतरले आहे.