‘डीआरडीओ’ कडून डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी  ‘बायो सूट’ची निर्मिती 

नवी दिल्ली –  कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांसाठी डीआरडीओने “बायो सूट ‘ तयार केला आहे.  कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्यासंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यांच्यावर  उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी  वैयक्तिक संरक्षक उपकरणांची (पीपीई) कमतरता भासत असल्याने डीआरडीओने या बायो-सूटची निर्मिती केली आहे.

देशात कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर संरक्षक साहित्याची मागणी वाढत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) तयार केलेला हा सूट रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांचे संसर्गापासून संरक्षण करण्यास उपयोगी ठरेल. “पीपीई’ वाढती मागणी लक्षात घेता दिवसाला १५ हजार सुट तयार करण्यात येणार असल्याचे  डीआरडीओतर्फे सांगण्यात आले. सध्या दिवसाला सात हजार सूट तयार करण्यात येत आहेत.

बायो-सूट तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे कोटिंग असलेल्या फॅब्रिकचा वापर करण्यात आला आहे.  वैज्ञानिकांनी विशेष तंतूंचा वापर करून वस्त्रोद्योग, नॅनो तंत्रज्ञानामधील आपले कौशल्य वापरून हा सूट विकसित केला आहे. चाचणी दरम्यान सर्व निकषांमध्ये हा सूट यशस्वी ठरला आहे. डीआरडीओने दोन कंपन्यांना  हा सूट  बनवण्याचे कंत्राट दिले असल्याचे संरक्षण मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

चीनच्या वुहानमध्ये कोरोणा विषाणूचा फैलाव  होण्यास सुरुवात झाली  तेव्हापासूनच डीआरडीओ या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी विविध साहित्य बनविण्यावर काम करीत आहे. डीआरडीओने  आतापर्यंत चार उत्पादने तयार केली आहेत.   सॅनिटायझर,  क्रिटिकल  केअर वेंटीलेटर,  मास्क  आणि बॉडी सुट  तयार करण्यात आले आहेत.

leave a reply