ब्रॅसिलिआ – ‘कोविड-१९’ ची साथ म्हणजे जगावर अधिराज्य गाजविण्यासाठी चीनने आखलेला कट आहे, असा आरोप ब्राझिलचे शिक्षणमंत्री अब्राहम विट्रॉब यांनी केला आहे. चीनकडून यावर तीव्र प्रतिक्रिया आली असून ब्राझिल सरकारकडे यावर खुलासा मागितला आहे.
कोरोनाव्हायरसच्या साथीबाबत जगातील प्रमुख देश चीनला जबाबदार ठरवत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या साथीचा उल्लेख चाइनीज व्हायरस असा केला होता. चीनने यावर आक्षेप नोंदविला होता. तसेच चीन जगभरातील देशाशी राजनैतिक मार्गाने संपर्क साधून या व्हायरसचा उल्लेख चिनी व्हायरस असा करू नका अशी विनंती करीत असून यामुळे चीनची प्रतिमा मलीन होत असल्याचे चीनचे म्हणणे आहे. मात्र चीनच्या या राजनैतिक मोहिमेनंतरही चीनवर होणारे आरोप थांबलेले नाहीत. काही देशांमध्ये चीनविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
ब्राझिलकडून चीनवर जागतिक कटाचा आरोप लावण्यात आला आहे. ”कोरोनाव्हायरसची साथ ही चीनने आखलेला कट आहे. जगावर वर्चस्व गाजवण्याचा चीनचा कुटील हेतू यामागे दडलेला आहे”, असे आरोप ब्राझिलचे शिक्षणमंत्री अब्राहम विट्रॉब यांनी केले आहेत. विट्रॉब यांनी सोशल मीडियावरून हे आरोप करताना ”भूराजकीयदृष्टया या जागतिक संकटातून कोण अधिक मजबूत होऊन बाहेर येईल? असा प्रश्न विचारला आहे. तसेच जगावर वर्चस्वसाठी ही अचूक योजना कोणाची आहे?, असा दुसरा प्रश्न विचारला आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी ब्राझिलच्या स्पेलिंगमधील ‘आर’च्या जागी ‘एल’ लावून ब्लाझिल असे लिहले आहे. चिनी भाषेत ब्राझीलला ब्लाझिल असे बोलले जाते. एकप्रकारे कोरोनाव्हायरसच्या जागतिक संकटाला विट्रॉब यांनी चीनशी जोडले आहे.
ब्राझिलमध्ये चीनची मोठी गुंतवणूक आहे. तसेच दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधही खूपच चांगले आहेत. असे असताना ब्राझिल सरकारमधील वरिष्ठ मंत्र्याने चीनवर केलेल्या थेट आरोपांवर आश्चर्य व्यक्त केले जाते. दोनच आठवड्यांपूर्वी ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो यांचे पुत्र एड्युआर्डो बोल्सोनारो यांनीही चीनवर आरोप केले होते. एड्युआर्डो बोल्सोनारो यांनी कोरोनाव्हायरस संकटासाठी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला जबाबदार धरले होते. चीनमधील हुकूमशाहीने कोरोनाव्हायरसच्या बाबतीत जगाची दिशाभूल केल्याचा आरोप एड्युआर्डो यांनी केला होता. त्यानंतर पुनः एकदा ब्राझिलने चीनवर ठपका ठेवला आहे.
ब्राझिलकडून लावण्यात येत असलेले आरोप हास्यास्पद, विद्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी आहेत, असे चीनचे ब्राझिलमधील राजदूत यांग वॅनमिंग यांनी म्हटले आहे. ब्राझिलच्या मंत्र्यांनी केलेले आरोप गंभीर असून ब्राझिल सरकारने अधिकृतपणे यावर स्पष्टीकरण द्यावे असे चीनने ब्राझिलला बजावले आहे.