देशात चोवीस तासात कोरोनाव्हायरसमुळे ५१ जणांचा बळी

महाराष्ट्रात ११ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) – देशात चोवीस तासात ५१ जण दगावल्याने कोरोनाव्हायरसचे संकट अधिक गंभीर बनल्याचे स्पष्ट होते. मुंबईतही या  साथीच्या   बळींची संख्या १०० वर पोहोचली आहे. तसेच देशात या साथीच्या रुग्णांची संख्या ९ हजाराच्या पुढे गेली असून मुंबईतच १५०० रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. देशात कोरोनाव्हायरसचा फैलाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मिझोराम, पुडुचेरी या राज्यांनीही लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याची घोषणा केली.
देशात कोरोनाव्हायरसमुळे ३२४ जण आतापर्यंत दगावले आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत या साथीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २७३ होती. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत ९,३५२ रुग्ण आढळले आहेत. यातील ८५७ जण आतापर्यंत बरे झाले असून देशात सध्या ८ हजार ४८ जण उपचार घेत आहेत.  महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, मध्यप्रदेश, गुजरात या पाच राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होत आहे. सोमवारी दिल्लीत एकाच दिवसात ३५६ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे दिल्लीतील रुग्णांची संख्या १५१०  वर पोहोचली आहे. सोमवारी  तामिळनाडूत ९८ नवे रुग्ण सापडले. यामुळे या राज्यातील रुग्णांची संख्या १ हजार १७३ वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रात इतर राज्यांपेक्षा सर्वात भयावह परिस्थिती आहे. राज्यात या साथीच्या रुग्णांची संख्या २ हजार ३३४ वर पोहोचली आहे. त्यातही मुंबई कोरोनाव्हायरसचा देशातील सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरला आहे. राज्यात एकाच दिवसात ११ जण दगावले, तर ३५२ नवे रुग्ण सापडले आहेत. यातील मुंबईतच दिवसभरात कोरोनाच्या ९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर २४२ नव्या रुग्णांची नोंद झाली. ३९ रुग्ण पुण्यात आढळले आहेत. सोमवारी दगावलेल्यांमध्ये ८ जणांना मधुमेह, हृदयरोग, अस्थमा सारखे आजार होते अशी माहिती, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत कोरोनाव्हायरसच्या  चाचण्या  अधिक प्रमाणात केल्या जात असून जिथे याचे रुग्ण सापडत आहेत,  त्या भागात घराघरांमध्ये जाऊन चाचण्या केल्या जात आहेत  यामुळे  रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे  सांगितले जाते  पुढच्या काळात ही बाब  सदर साथ  रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल, असे दावे ही केले जातात

दरम्यान गेल्या १४ दिवसात १५ राज्यांमधील २५ जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही, तसेच एकाच दिवसात १४१ जण बरे झाल्याची सकारत्मक बाब समोर आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले आहे.

leave a reply