केंद्रीय गृहमंत्रालयाकडून लॉकडाऊनचे आणखी काही नियम शिथिल

मात्र अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था)  –  देशात कोरोनाव्हायरसच्या साथीत दगावलेल्यांची संख्या ७७९ वर पोहोचली आहे, तर एकूण रुग्णांची संख्या २५ हजाराच्या पुढे गेली आहे. देशात या साथीच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये लॉकडाऊनचे नियम अधिक शिथिल करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे. हॉटस्पॉट,  कंटेन्मेंट झोनमधील दुकाने, बाजारपेठा आणि मॉल्स वगळून इतर दुकाने सुरु करण्याची परवानगी गृहमंत्रालयाने दिली असून तसे आदेश शुक्रवारी रात्री काढण्यात आले. मात्र याबाबत अंतिम निर्णय राज्य सरकारचा असेल असेही केंद्राने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने याआधी  ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये  उद्योग, माल वाहतूक, शेतीच्या कामाशी निगडित अवजारांची आणि खताची दुकाने काही अटींसह उघडण्याची परवानगी दिली होती. तसेच दोन दिवसांपुर्वी मोबाईल रिचार्जची, पंख्यांची, पाठ्यपुस्तकांच्या दुकानानांही  लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली. शुक्रवारी  लॉकडाऊनच्या नियम आणखी काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. 

महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात बाजारपेठा आणि त्याभागातील दुकाने, तसेच रेड झोनमधील दुकाने वगळता इतरत्र असलेली नोंदणीकृत दुकाने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मोबाईल फोन, हार्डवेअर, गारमेंट सुरु करता येणार. मात्र मॉल, दारू, सिगारेटची दुकाने बंदच राहणार आहेत. सलून आणि रेस्टॉरंट्सही सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच ई- कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूखेरीज इतर वस्तूंचा पुरवठा कारण्यावरील बंदीही कायम ठेवण्यात आली आहे. जी दुकाने सुरु करण्यात येतील त्यामध्ये ५० टक्के कामगारच काम करू शकतील आणि सोशल डिस्टंसिगचे काटेकोर पालन करावे लागेल, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, याबाबत अंतिम निर्णय राज्य सरकारांचा असणार आहे. मात्र काही राज्य सरकारांनी यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. महाराष्ट्र, पंजाब सरकारने विचारविनिमय करून याबाबत निर्णय घेण्यात येईल असे संकेत दिले आहेत.

leave a reply