जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३० लाखांवर

- ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून धोक्याचा इशारा

बाल्टिमोर/लंडन – कोरोनाव्हायरसमुळे जगभरात २,०८,०७४ जणांचा बळी गेला असून या साथीच्या रुग्णांची संख्या ३० लाखांच्याही पुढे गेली आहे. गेल्या चोवीस तासात जगभरात ४५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिका, ब्रिटन, रशिया, जर्मनी, ब्राझिल या देशांमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी देशवासियांना येत्या काळात या साथीचा धोका वाढणार असल्याचे बजावले आहे.

या साथीने रविवारी अमेरिकेत १,३३० जणांचा बळी घेतल्याची माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली. त्याआधी अमेरिकेत शनिवारी २,४९४ तर शुक्रवारी १,२५८ जण दगावले होते. या साथीने अमेरिकेत दगावलेल्यांची संख्या ५४,८४१ वर पोहोचली आहे. तर एक लाख अठरा हजार जण या साथीतून बरे झाले आहेत.

युरोपिय देशांमध्ये या साथीने १,२२,६४४ जणांचा बळी घेतला असून इटलीमध्ये सर्वाधिक बळी गेले आहेत. गेल्या चोवीस तासात या साथीने इटलीत २६० जणांचा बळी घेतला असून या एका दिवसात स्पेनमध्ये ३३१ जण दगावले. गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत आपल्या देशातील बळी आणि नव्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचे जाहीर करुन या दोन्ही देशांनी लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. इटलीत या साथीने एकूण २६,६४४ तर स्पेनमध्ये २३,५२१ जणांचे बळी गेले आहेत.

गेल्या चोवीस तासात ब्रिटनमध्ये या साथीचे ३५० बळी गेले असून ब्रिटनमधील एकूण बळींची संख्या २०,७३२ वर गेली आहे. इतर युरोपिय देशांप्रमाणे ब्रिटनमधील बळींच्या संख्येत घट झाली असली तरी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाउनचे नियम शिथिल केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. लॉकडाउनच्या नियमांचे पालन केले नाही तर या साथीची दुसरी लाट ब्रिटनवर धडकेल, असा इशारा पंतप्रधान जॉन्सन यांनी दिला आहे.

आखाती देशांमध्ये दहा हजारांहून अधिक जणांचा बळी गेला असून तुर्की आणि इराण या देशांमध्ये या साथीचे मोठ्या प्रमाणात बळी गेले आहेत. यापैकी इराणमध्ये गेल्या चोवीस तासात ९६ दगावले असून एकूण बळींची संख्या ५,८०६ वर पोहोचल्याची माहिती इराणच्या सरकारने दिली. पण इराणने जाहीर केले आहे, त्याहून कितीतरी अधिक प्रमाणात या देशात कोरोनाचे बळी गेल्याचा दावा केला जातो. तर तुर्कीमध्ये गेल्या चोवीस तासात या साथीने ९९ जण दगावले असून या देशातील एकूण बळींची संख्या २,८०५ वर पोहोचली आहे. तुर्कीमधील या साथीच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून गेल्या चोवीस तासात अडीच हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तुर्कीत या साथीचे एक लाख दहा हजार रुग्ण आहेत.

लॅटीन अमेरिकेत या साथीने आतापर्यंत ६३२१ जणांचा बळी घेतला आहे. ब्राझिलमध्ये या साथीचे सर्वाधिक बळी गेले असून कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण देखील याच देशात आहेत. लॅटीन अमेरिकेतील एकूण बळींच्या तुलनेत एकट्या ब्राझिलमध्ये या साथीने ४,२९८ जण दगावले आहेत. तर ब्राझिलमध्ये या साथीचे ६३,३२८ रुग्ण असून लॅटीन अमेरिकी देशांमधील या साथीच्या रुग्णांची संख्या १,३८,४८३ इतकी आहे. असे असूनही ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सेनारो संपूर्ण लॉकडाउन करायला तयार नाहीत. यासाठी त्यांच्यावर सडकून टीका होत आहे.

आफ्रिकी देशांमध्ये कोरोनाव्हायरसमुळे १,४३१ जणांचा बळी गेला असून या साथीचे ३२,८८७ रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत या साथीचे अल्जेरियात ४२५ तर इजिप्तमध्ये ३१७ बळी गेले आहेत. आफ्रिकेतील बळींची आणि रुग्णांची संख्या तसेच येथील परिस्थिती लॅटीन अमेरिका, आखात किंवा युरोपिय देशांच्या तुलनेत अतिशय भयंकर बनेल, असा दावा केला जातो. कारण आफ्रिकेतील किमान दहा देशांकडे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेन्टिलेटर्सच नसल्याची माहिती समोर आली होती.

leave a reply