काबूल – फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अमेरिका आणि तालिबानमध्ये अफगाणिस्तानबाबतचा शांती करार पार पडला. यानंतर अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित होऊन रक्तपात थांबेल अशी अपेक्षा होती. मात्र अफगाणिस्तानातील संघर्ष या शांती करारानंतर अधिकच रक्तरंजित बनला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली असून या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यातच अफगाणिस्तानातील संघर्षांमध्ये पाचशेहून अधिक जणांचा बळी गेल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अफगाणिस्तानातील ‘युनायटेड नेशन असिस्टंस मिशन’ने अफगाणिस्तानच्या संर्घषावर अहवाल प्रसिद्ध केला. यात या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात अफगाणिस्तानातील संर्घषात ५३३ जण ठार झाले असून यात १५० मुलांचा समावेश आहे. तसेच या संघर्षात १,२९३ जण जखमी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत जखमींची संख्या कमी असल्याचे सांगितले जाते. पण बळींची संख्या वाढल्याचे सांगून संयुक्त राष्ट्रसंघाने या अहवालात त्यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
२९ फेब्रुवारी रोजी कतारच्या दोहा इथे अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतीकरार पार पडला होता. पण काही तासांनी तालिबानच्या गटांनी अफगाणिस्तानमध्ये हल्ले सुरु ठेवून करार मोडीत काढण्याचे संकेत दिले होते. आजही अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हल्ल्याचे सत्र थांबलेले नाहीत. उलट शांतीकरारानंतरही तालिबानचे हल्ले तीव्र झाले आहेत. गेल्या आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानच्या सुरक्षायंत्रणावर चढविलेल्या हल्ल्यात १३ जवान ठार झाले होते. दर दोन दिवसांनी तालिबानच्या हल्ल्यात २५ ते ४० जणांचा बळी जात असल्याचे अफगाणिस्तानातल्या माध्यमांमध्ये सांगितले जाते.
तालिबानचे काही सदस्य अफगाणी सुरक्षा दलाच्या ताब्यात असून अफगाणी सरकारने त्यांची सुटका केल्याखेरीज सुरक्षा दलांवर हल्ले थांबणार नसल्याचे तालिबानने घोषित केले आहे. तसेच अफगाणिस्तानात सध्या सत्तेवर असलेले अश्रफ गनी यांचे सरकार आपल्याला मान्य नसल्याचे तालिबानने अनेकवार स्पष्ट केले होते. त्यामुळे इतक्यात तरी तालिबानचे अफगाणिस्तानातील हल्ले थांबण्याची शक्यता नाही. तालिबान अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांवर घणाघाती हल्ले चढवीत असताना अमेरिका आणि तालिबानमधल्या शांती कराराने नक्की काय साधले असा प्रश्न तालिबानचे विरोधक विचारत आहेत.
सध्या अफगाणिस्तानला कोरोनाव्हायरसच्या भयंकर संकटाचा सामना करावा लागत आहे. अफगाणिस्तानमध्ये कोरोनाव्हायरसमुळे ५७ जणांचा बळी गेला आहे. तर या साथीची लागण झालेल्यांची संख्या १,७०३वर गेली आहे. अफगाणिस्तानच्या काही प्रांतात आरोग्य सुविधांची वानवा आहे. त्यात अफगाणी जनतेला तालिबानच्या हल्ल्याचा सामना करावा लागतो, याकडे अफगाणी माध्यमांनी लक्ष वेधले. दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानाच्या परराष्ट्रमंत्र्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत अफगाणिस्तानाच्या शांतीप्रकियेचा विषय अग्रस्थानी होता.