चिनी ‘टेस्टिंग किट्स’ची ऑर्डर रद्द करण्याचा भारताचा निर्णय बेजबाबदारपणाचा

- चीनचा थयथयाट

नवी दिल्ली – सदोष रॅपिड टेस्टिंग किट्स पाठविणाऱ्या चिनी कंपन्यांची ऑर्डर भारताने रद्द केल्यावर चीन अस्वस्थ झाला आहे. चिनी कंपन्यांच्या टेस्टिंग कीट्सला खराब सांगणाऱ्यानी हे किट्स चुकीच्या पद्धतीने हाताळले असल्याचा उलटा आरोप चीनकडून करण्यात आला. तसेच चिनी उत्पादनांना खराब ठरवणे बेजाबदार आणि पूर्वग्रहदूषित असल्याचे चिनी दूतावासाच्या प्रवक्त्या जी रोंग यांनी यांनी म्हटले आहे.
‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) ‘ग्वांगझू वोन्डफो बायोटेक’ आणि ‘झूआई लिव्हझोन डायग्नॉस्टिक्स’ या दोन चिनी कंपन्यांकडून आयात करण्यात आलेल्या कोरोनाव्हायरसच्या ‘रॅपिड टेस्टिंग किट्स’ दर्जाहीन असल्याचे सांगितले होते. तसेच या कंपन्यांना दिलेली टेस्टिंग किट्सची ऑर्डरच रद्द करण्यात आल्याचे भारताने जाहीर केले होते. याआधी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी खराब टेस्टिंग किट्स कोणत्या का देशाच्या असेनात त्या परत केल्या जातील आणि त्याचा एकही रुपया चुकता केला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते.

यावर आता चीनची प्रतिक्रिया आली आहे. या टेस्टिंग किट्सची ऑर्डर रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर चीनने चिंता व्यक्त केली आहे. चिनी दूतावासाच्या प्रवक्त्या जी रोंग यांनी चीन आपल्या उत्पादनाच्या गुणवत्तेला विशेष महत्व देतो, असे म्हटले आहे. ‘ग्वांगझू वोन्डफो बायोटेक’ आणि ‘झूआई लिव्हझोन डायग्नॉस्टिक्स’ या कंपन्यांच्या टेस्टिंग कीट्सला ‘नॅशनल मेडिकल प्रॉडक्ट ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ चायना’ने गुणवत्ता प्रमाणपत्र दिले आहे. तसेच भारतात पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ विरॊलॉजि’ने हे टेस्टिंग किट्स समाधानकारक असल्याची मान्यता दिली होती, याकडे लक्ष वेधत रोंग यांनी चिनी कंपन्यांचा बचाव केला. तसेच या टेस्टिंग किट्स तज्ज्ञ व प्रशिक्षित व्यक्तीकडून हाताळण्यात आलेले नाहीत, असे सांगून रोंग यांनी भारतावरच उलटे आरोप केले आहेत.

याशिवाय काही जण चिनी उत्पादनांना खराब सांगत आहेत आणि या मुद्याकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहत आहेत. हे चुकीचे आणि बेजवाबदारपणाचे आहे, असे रोंग यांनी म्हटले आहे. मात्र रोंग यांनी त्या कोणाबद्दल याबाबत अधिक बोलण्याचे टाळले आहे. तसेच या दोन चिनी कंपन्यांनी युरोप, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत इतरही देशांना या किट्स निर्यात केल्या आहेत, याकडेही रोंग यांनी लक्ष वेधले. मात्र युरोपीय देशांनीही चिनी टेस्टिंग कीट्सच्या गुणवत्तेबाबत भारतासारखाच ठपका ठेवला होता आणि सुमारे २० लाख किट्स परत चीनला पाठवले होते, याबाबत रोंग यांनी अवाक्षरही काढलेले नाही.

टेस्टिंग किट्स हा भारत आणि चीनमध्ये वादाचा नवा मुद्दा ठरू शकतो, अशी शक्यता विश्लेषक व्यक्त करीत आहेत. गेल्याच आठवड्यात संधीसाधू चीनने आर्थिक संकटाच्या काळात भारतात मोठी गुंतवणूक करून भारतीय कंपन्यांचे अधिग्रहण करण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी सरकारने ‘थेट परकीय गुंतवणुकी’च्या (एफडीआय) नियमात बदल केले होते. त्यानंतर चिनी कंपन्यांची ऑर्डर रद्द करून भारताने चीनला आणखी एक धक्का दिला आहे.

leave a reply