जिनिव्हा – कोरोनव्हायरसच्या साथीमुळे ठप्प पडलेले उद्योग व कमी झालेले कामाचे तास यामुळे जगभरातील दीडशे कोटी लोकांवर बेकारीचे संकट ओढवणार असल्याचा थरकाप उडविणारा इशारा ‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’ने (आयएलओ) दिला. उत्पादन व रिटेल या दोन क्षेत्रांना याचा सर्वाधिक फटका बसणार असून ४३ कोटींहून अधिक उद्योगधंद्यांना जबर नुकसान सहन करावे लागेल, असे ‘आयएलओ’ने आपल्या नव्या अहवालात बजावले आहे.
जगातील विविध देशांमध्ये कार्यरत कामगार व कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधित्व करणारी शिखर संघटना म्हणून ‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’ची ओळख आहे. या संघटनेने कोरोनाव्हायरस साथीचे परिणाम सांगणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. ‘कोव्हिड-१९ अँड द वर्ल्ड ऑफ वर्क’ नावाच्या या अहवालात जगावर ओढविणाऱ्या बेकारीच्या भीषण संकटाकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या ३३० कोटी लोकांना रोजगार उपलब्ध आहे. यातील जवळपास २०० कोटी रोजगार हे ‘अप्रत्यक्ष’ अर्थव्यवस्थेशी (इन्फॉर्मल इकॉनॉमी) जोडलेले आहेत. जगभरात उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये या क्षेत्रातील रोजगार सर्वात अस्थिर व संवेदनशील असल्याचे मानले जाते.
सध्या कोरोनाच्या साथीमुळे अप्रत्यक्ष अर्थव्यवस्थेशी जोडलेल्या नोकऱ्यांपैकी सुमारे १६० कोटी जणांच्या उत्पन्नाला जबरदस्त धक्के बसले आहेत. लॉकडाऊन व इतर उपायांमुळे या नोकऱ्यांमधील उत्पन्न तब्बल ६० टक्क्यांनी घटले असल्याची माहिती ‘आयएलओ’ने दिली.
सर्वात मोठी घट अमेरिका व आफ्रिका खंडातील नोकऱ्या व उत्पन्नामध्ये दिसून आली आहे. या देशांमधील रोजगार तसेच उत्पन्नात ८० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. युरोप व मध्य आशिया खंडात ७० टक्के घसरण झाली असून आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रातील देशांमध्ये २१ टक्क्यांहून अधिक घट झाल्याची चिंता ‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’ने आपल्या अहवालात व्यक्त केली.
‘कोट्यावधी लोकांच्या हाती काम नसणे याचा अर्थ त्यांना अन्न, सुरक्षा आणि भविष्य नसणे असा होतो. जगाच्या कानाकोपऱ्यात लक्षावधी उद्योगधंदे अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यांच्याकडे काहीही बचत राहिलेली नाही आणि कर्ज मिळवण्यासाठी मार्ग उपलब्ध नाहीत. हे अर्थव्यवस्थेचे भीषण वास्तव आहे. या क्षणाला आपण सारे मिळून जर त्यांना सहाय्य करण्यात अपयशी ठरलो तर हे लक्षावधी उद्योग व रोजगार कायमचे नाहीसे होतील’, अशा शब्दात ‘आयएलओ’चे प्रमुख गाय रायडर यांनी जगाला कोरोना साथीच्या गंभीर परिणामांची जाणीव करून दिली.