तालिबानला भारताबरोबर सकारात्मक संबंध हवे आहेत

- तालिबानच्या प्रवक्त्याचा दावा

नवी दिल्ली/दोहा – तालिबानच्या हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानची शांतीप्रकिया धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत भारताने अफगाणिस्तानातील शांततेसाठी अधिक योगदान द्यावे, असे आवाहन अमेरिकेचे विशेष दूत झल्मे खलिलझाद यांनी केले होते . यानंतर तालिबानच्या अधिकृत प्रवक्त्याने आपल्या संघटनेला भारताशी सकारात्मक संबंध अपेक्षित असल्याचा दावा केला आहे. तसेच भारताच्या अफगाणिस्तानातील योगदानाचे तालिबान स्वागत करीत असल्याचेही या प्रवक्त्याने म्हटले आहे. सोव्हिएत रशियाला पराभूत करून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत करणाऱ्या तालिबानने त्याकाळी काश्मीरमधील दहशतवादाला सहाय्य केले होते. पण आता आपली भारताबाबतची भूमिका बदललेली असल्याचे संकेत तालिबानकडून दिले जात आहेत.

नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांना अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घ्यायचे आहे. त्यातच कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे अमेरिकन सैन्याला अफगाणिस्तानात ठेवणे अधिकच अवघड बनले असून लवकरात लवकर अमेरिकन सैन्यांची माघारी घेण्यासाठी ट्रम्प प्रशासन जोरदार हालचाली करीत आहे. मात्र अफगाणिस्तानचे सरकार आणि तालिबानमध्ये सुरु झालेल्या संघर्षाच्या सत्रामुळे अमेरिकेची सैन्य माघार धोक्यात आली आहे. तालिबानने भीषण दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरू केले असून यामुळे अफगाणिस्तानातील सैन्य माघारीच्या प्रस्तावावर फेरविचार करावा लागेल, असे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून बजावले जात आहे. म्हणूनच अमेरिकेने अफगाणिस्तानसाठी नियुक्त केलेले विशेषदूत झल्मे खलिलझाद अफगाणिस्तानच्या शेजारी देशांचे सहकार्य घेऊन शांती प्रक्रिया प्रस्थापित करण्याचा जबरदस्त राजकीय प्रयत्न करीत आहेत. यासाठी झल्मे खलिलझाद यांनी भारताला भेट दिली होती व त्यानंतर ते पाकिस्तानात गेले होते. आपल्या भारतभेटीत झल्मे खलिलझाद यांनी भारत आणि अफगाणिस्तानच्या शांती प्रक्रियेसाठी अधिक योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. भारताचे अफगाणिस्तानशी ऐतिहासिक संबंध आहेत. तसेच अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारताने बहुमोल योगदान दिले आहे. याचीही आठवण खलिलझाद यांनी करून दिली. तसेच तालिबानबरोबरील समस्या सोडविण्यासाठी भारताने थेट तालिबानशी चर्चा करावी, असा सल्लाही खलिलझाद यांनी दिला.

अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील सैन्य माघारीनंतर हा देश पुन्हा एकदा तालिबानच्या कचाट्यात सापडेल, अशी भीती भारताने व्यक्त केली होती. एकदा का अफगाणिस्तान तालिबानच्या तावडीत सापडला तर हा देश दहशतवादाचे केंद्र बनेल, अशी चिंता भारताने वेळोवेळी बोलून दाखविली होती. त्यामुळे भारताने अमेरिका व तालिबानमधील शांती करारावर ही अत्यंत सावध भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या विशेष दूतांनी भारताला तालिबानशी चर्चा करण्याचा दिलेला सल्ला लक्ष वेधून घेणारा होता. त्यांच्या या सल्ल्याला काही तास उलटत नाही तोच तालिबानच्या कतार येथील कार्यालयातील प्रवक्त्याने भारताची प्रशंसा केली आहे.

तालिबानचा प्रवक्ता सोहेल शाहीन याने अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारत देत असलेल्या योगदानाचे तालिबान स्वागत करीत असल्याचे म्हटले आहे. तसेच तालिबानला भारताबरोबर सकारात्मक संबंध अपेक्षित असल्याचा दावा शाहीन यांनी केला आहे. वेगळ्या शब्दात अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आली तर त्यापासून भारताला धोका नसेल, असा संदेश देण्याचा प्रयत्न तालिबानकडून केला जात आहे. नव्वदीच्या दशकात ज्याप्रमाणे तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तान भारतविरोधी दहशतवादी कारवायांचे केंद्र बनला होता, तशी परिस्थिती आता उद्भवणार नाही असे तालिबान सांगू पाहत आहे. भारताने अफगाणिस्तानातील लोकनियुक्त सरकारला आपले समर्थन असेल असे जाहीर केले आहे. तसेच अफगाणिस्तानातील लोकशाहीची प्रक्रिया मागे घेतली जाऊ नये अशी भारताची आग्रही भूमिका आहे. त्यामुळे तालिबान कडून मिळत असलेल्या संदेशावर भारताकडून यापेक्षा वेगळी भूमिका घेतली जाण्याची शक्यता नाही. भारताचे सहकार्य मिळवायचे असेल तर तालिबानला त्यासाठी दहशतवाद सोडून द्यावा लागेल व पाकिस्तानच्या इशाऱ्याने काम करण्याचे धोरण बदलावे लागेल. त्याची तयारी तालिबान दाखवणार का? या प्रश्नाचे उत्तर तालिबान अफगाणिस्तानचे भवितव्य निश्चित करू शकतो.

leave a reply