मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यात ३० जून पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनच्या या टप्प्यात राज्य सरकारने काही मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. रेड झोन वगळून इतर ठिकाणीकाही काही सेवा सुरु केल्या जातील. मात्र रेड झोनमधील महापालिकांमध्ये टप्प्या टप्प्याने काही गोष्टी सुरु केल्या जाणार आहेत. रेड झोनमध्ये प्रवासी मर्यादेसह रिक्षा, टॅक्सी सुरु केली जाणार असून सरकारी कार्यालये १५ टक्के उपस्थितीसह सुरु करण्यात येणार आहेत. याशिवाय खाजगी कार्यालये दहा टक्के उपस्थितीसह सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
शनिवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने कंटेन्मेंट क्षेत्र वगळून लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला होता व यासंबंधी गाईडलाईन्स जारी केल्या होत्या. या गाईडलाईन्सच्या बंधनात राहून राज्ये आपल्या पातळीवर काय सुरु ठेवायचे, काय नाही, याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकतात, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने
राज्यात प्रार्थनास्थळे, मॉल, हॉटेल्स बंदच राहणार आहेत. शाळा, महाविद्यालये, सलून,ब्युटी पार्लर,मेट्रो रेल्वे, मनोरंजनाचे कार्यक्रम, सभा यांच्यावरील बंदी कायम असेल. मात्र सरकारी व खासगी मैदाने, गार्डन, सायकलिंग, जॉगिंगला परवानगी देण्यात आली आहे.पण या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग अनिवार्य असेल. तसेच लहान मुलांसोबत मोठी व्यक्ती बरोबर असणे आवश्यक असेल. ३ जून पासून पहिल्या टप्प्यात ही सूट मिळणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यात सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह सुरु होतील. प्लंबर, इलेक्ट्रेशियन, पेस्ट कंट्रोल आणि इतर तांत्रिक कामांना मंजुरी दिली जाईल.
दुसऱ्या टप्प्यात बाजार आणि दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. ५ जूनपासून दुसरा टप्पा सुरु होत असून सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने सुरु राहतील. मात्र सम-विषम तत्वानुसार एका लेनमधील एका दिवशी, तर दुसऱ्या लेनमधील दुकाने दुसऱ्या दिवशी सुरु राहतील. तसेच सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळणारी दुकाने बंद केली जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय घरापासून जवळ असलेल्या दुकानांमध्येच खरेदीसाठी जाण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच दुकानांपर्यंत जाण्यासाठी पायी जावे किंवा सायकलचा वापर करावा, अशी सूचना देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातच रिक्षा आणि टॅक्सीही सुरु होतील. मात्र याच्या प्रवासी संख्येवर मर्यादा असेल. चालक आणि दोन प्रवासी इतकेच रिक्षा आणि टॅक्सीतून प्रवास करू शकतील.
तिसऱ्या टप्प्यात ८ जूनपासून खाजगी कार्यालये सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून केवळ १० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. तर इतर कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरु ठेवावे, तसेच कामाच्या ठिकाणी येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सॅनेटायझेशनची व्यवस्था असावी, अशी अट घालण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यांतर्गत बस सेवेला परवानगी देण्यात येईल, मात्रएका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्हयात बस सेवाला परवानगी नसेल असे राज्य सरकारने म्हटले आहे. वृत्तपत्र घरपोच पोहचवण्यास परवागी देण्यात आली आहे. तसेच सकाळी ९ ते ५ अनावश्यक कामासाठी बाहेर पडण्यावर बंदी कायम राहणार आहे, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.