दुसऱ्या ‘पुलवामा’चा कट आखणारा ”जैश’चा ‘फौजी भाई’ ठार

श्रीनगर – गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामापेक्षा भयंकर दहशतवादी हल्ला घडविण्याचा कट सुरक्षादलांनी उधळला होता. या काटातील मुख्य सुत्रधारांपैकी एक असलेला अब्दुर रेहमान उर्फ फौजी भाई याला सुरक्षादलांनी चकमकीत ठार केले. फौजी भाई हा ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख मौलाना मसूद अझहरचा नातलग असल्याचा आणि गेल्यावर्षी फेब्रुवारीत पुलवामामध्ये ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातही सहभागी असल्याचा दावा केला जातो. या हल्ल्यात ४० जवान शहिद झाले होते. त्यामुळे ‘आयईडी’ बनविण्यात एक्सपर्ट असलेला ‘जैश’चा कमांडर मारला जाणे हे सुरक्षादलांना मिळालेले फार मोठे यश ठरते.

jaish pulwamaगेल्या आठवड्यात ‘सीआरपीएफ’च्या ४०० जवानांना घेऊन जाणाऱ्या २० वाहनाच्या ताफ्याला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांनी आखलेला कट सुरक्षादलांनी उधळला होता. १४ फेब्रुवारी २०१९ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यापेक्षा प्रचंड हानी घडविण्याचे दहशतवाद्यांचे कारस्थान होते. मात्र यासाठी दहशतवादी घेऊन जात असलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा थरारक पाठलाग करीत सुरक्षादलांनी दहशतवाद्यांचे सारे मनसुबे उधळले होते. दहशतवाद्यांना ही गाडी रस्त्यातच सोडून पळ काढावा लागला. यानंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम सुरु असून गेल्या सहा दिवसात १५ दहशतवाद्यांना सुरक्षादलांच्या जवानांनी चकमकीत ठार केले आहे. गेल्या चोवीस तासातच पाच दहशतवादी ठार झाले आहेत. बुधवारी सकाळी पुलवामाच्या कांगन भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. यामध्ये ‘जैश‘चा कमांडर अब्दुर रेहमान उर्फ फौजी भाई सामील आहे.

फौजी भाई हा २०१७ साली घुसखोरी करून काश्मीरमध्ये दाखल झाला होता. ‘आयईडी’ बनविण्यात तज्ज्ञ असलेल्या फौजी भाईने गेल्यावर्षीच्या पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेल्या गाडीत स्फोटके बसविण्याचे काम केले होते, असा दावा केला जातो. तसेच तो इतरही अनेक हल्ल्यात सहभागी होता. त्यामुळे सुरक्षादलांकडून त्याचा शोध सुरु होता. मूळचा पाकिस्तानच्या मुलतानमधील असलेला फौजी भाई हा गेल्यावर्षी एका चकमकीत थोडक्यात निसटला होता, अशी माहिती समोर येत आहे. तसेच फौजी भाई ‘जैश’चा प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा भाचा असल्याचा दावा केला जातो. ‘अझहर’चा भाऊ आणि कंदहार विमान अपहरणाचा सूत्रधार अब्दुल रौफचा तो विशेष विश्वासू सहकारी होता,अशाही बातम्या येत आहेत.

‘जैश’चे ‘आयईडी’ बनविण्यात तज्ज्ञ असलेले आणखी दोन पाकिस्तानी दहशतवादी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय आहेत. वालिद भाई आणि लंबू भाई अशी या दोघांची नावे असून सुरक्षादलांचे पुढचेलक्ष्य हे दोघे असल्याचे जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी म्हटले आहे. हे दोघेही दुसरे पुलवामा घडविण्यासाठी आखलेल्या कटात सहभागी होते. याशिवाय अब्दुल रशीद गाझी हा पुलावामाच्या खेरव भागात सक्रिय असलेला आणखी एक ‘जैश’ कमांडरही सुरक्षादलांच्या हिटलिस्टवर असल्याची माहिती कुमार यांनी दिली.

दरम्यान, यावर्षात जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत ७५ दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले आहे.यामध्ये दहशतवादी संघटनांचे काही प्रमुख कमांडर मारले गेले आहेत. ‘हिजबूल’चा रियाझ नायकू, जुनैद सेहरीइ, हांडवारामध्ये मारला गेलेला ‘लश्कर’चा कमांडर हैदरचा यामध्ये समावेश आहे.

leave a reply