बाल्टिमोर – गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाव्हायरसमुळे जगभरात ४,७०० हून अधिक जण दगावले आहेत. तर या एका दिवसात जगभरात १,१५,००० हून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना या साथीचे तीस लाखांहून अधिक रुग्ण बरे झाल्याच्या समाधानकारक बातम्या समोर येत आहेत.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोनाने दगावलेल्यांची एकूण संख्या ३,८४,१७८ वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये या साथीने जगभरात ४,७८२ जणांचा बळी गेला असून यात ब्राझीलमधील १,२६२ रुग्णांचा समावेश आहे. याबरोबर ब्राझीलमधील या साथीने दगावणाऱ्यांची एकूण संख्या ३१,१९९ वर पोचली आहे. तर या साथीने अमेरिकेत आतापर्यंत १,०८,३३७ जण दगावले आहेत. यात अमेरिकेत गेल्या चोवीस तासात बळी गेलेल्या १,०८१ रुग्णांचा समावेश आहे.
गेल्या चोवीस तासात ब्राझीलमध्ये कोरोनाचे २८,९३६ नवे रुग्ण आढळले असून या देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५,५५,३८३ च्याही पुढे गेली आहे. तर अमेरिकेमध्ये या साथीचा सर्वाधिक संसर्ग झाला असून या देशात १८,८७,९३७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या चोवीस तासात अमेरिकेमध्ये २२ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जगभरातील ४८ लाखाहून अधिक कोरोनाबाधित १३ देशांमध्ये आहेत. यापैकी अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन, इटली आणि भारत या देशांमधील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाखांच्याही पुढे आहे. तर फ्रान्स, जर्मनी, पेरू, तुर्की व इराण या देशांमध्ये एक लाखाहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.
मंगळवारी चीनच्या ‘वुहान सेंट्रल हॉस्पिटल’मधील दोन डॉक्टरांच्या मृत्यूमुळे चीनमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये या हॉस्पिटलमधील सहा मोठ्या डॉक्टरांचा या साथीने बळी घेतला आहे. वुहानमधील कोरोनाव्हायरसची माहिती पहिल्यांदा जगासमोर मांडणारे ‘डॉक्टर ली व्हेनलियांग’ यांच्या मृत्यूनंतर चीनमध्ये असंतोष वाढला होता. तशीच परिस्थिती आताही निर्माण झाल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत. या साथीची माहिती उघड होऊ नये, म्हणून सदर हॉस्पिटलने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ‘पीपीई किट’ वापरण्यास मनाई केली होती, अशी धक्कादायक बाबही यानिमित्ताने समोर येत आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे नेते गुलाम मोर्ताझा बलोच यांचा या साथीने मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या एकट्या लाहोर शहरातच कोरोनाचे साडेसहा लाखांहून अधिक रुग्ण असल्याची धक्कादायक माहिती काही तासांपूर्वी प्रसिद्ध झाली होती.