‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगडमध्ये लाखो घरांचे नुकसान

Nisarg Cycloneमुंबई – ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात लाखो घरांचे आणि पाच हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच लाखाहून अधिक झाडे कोसळली असून वादळामुळे झालेल्या नुकसानाचा अंदाज येण्यास दोन दिवस लागणार आहेत. येथे दोन दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. वादळामुळे राज्यात ७२.५ मिमी पाऊस झाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचा अंदाज घेतला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानाची प्रथमिक माहिती दिली. रायगड, रत्नगिरी, मुंबई, ठाणे, पालघर ह्या सर्वच जिल्ह्यांना वादळाचा फटका बसला. मात्र वादळाचा सर्वात जास्त तडाखा रायगड जिल्ह्याला बसला. विजेचे शेकडो खांब कोसळल्याने येथील वीज पुरवठा अजूनही खंडित आहे. ५०० मोबाईल टॉवरचेही नुकसान झाल्याने मोबाईल सेवेवरही परिणाम झाला आहे. वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेश राज्य सरकारने महावितरणाला दिले आहेत. यासाठीचे अधिकचे मनुष्यबळ लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

तसेच घरांचे झालेले नुकसान आणि वीज पुरवठा खंडित असल्याने येथील नागरिकांना अन्न पुरवठ्याची तातडीने सोय करा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. मुरुड आणि श्रीवर्धन जिल्ह्यातील दळणवळण पूर्ण ठप्प असल्याची माहिती यावेळी जिल्हा प्रशासनतर्फ़े देण्यात आली.

maharashtra Nisarg Cycloneरत्नागिरी जिल्ह्यातही राजापूर, रत्नागिरी शहरात नुकसान झाले आहे. मात्र वादळ किनारपट्टीवर धडकण्याचा केंद्रबिंदू अलिबाग असल्याने येथून जवळ असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगडमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. या तालुक्यात किनारपट्टीवरील कित्येक घरांची पडझड झाली आहे. या दोन तालुक्यात १९६२ विजेचे खांब कोसळले आहेत आणि काही सब स्टेशनचे नुकसान झाले आहे. येथेही पंचनामे सुरु करण्यात आले आहेत.

दरम्यान, वादळ ओसरले असले, तरी वादळाचा प्रभाव कायम असून यामुळे गुरुवारी कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस झाला. रत्नागिरीत १२२ एमएम पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत ५० एमएम पाऊस झाला आहे.

leave a reply