बाल्टिमोर – कोरोनाव्हायरसमुळे जगभरात गेल्या २४ तासात साडेचार हजारांहून अधिक जणांचा बळी गेला असून एकूण रुग्णांची संख्या ६६ लाखांवर जाऊन पोहोचली आहे. रशिया, ब्राझील व मेक्सिकोत या साथीचे रुग्ण वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, जगातील विविध देश कोरोना साथ रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन उठवित असतानाच युरोप मधील आघाडीचा देश असणाऱ्या स्पेनने ‘कोरोना इमर्जन्सी’ २१ जून पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोनाने दगावलेल्यांची संख्या ३,८८,७५९ वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये या साथीने जगभरात ४,५८१ जणांचा बळी गेला असून यात ब्राझीलमधील १,३४९ तर मेक्सिकोतील १,०९२ रुग्णांचा समावेश आहे. ब्राझीलमष्ये या साथीत बळी गेलेल्यांची संख्या ३२ हजारांवर गेली आहे. मेक्सिकोतील बळींच्या आकडेवारीने ११ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. रशियात गेल्या २४ तासात ८,८३१ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या ४,४१,१०८वर पोहोचली आहे.
अमेरिकेत कोरोनाच्या साथीत आतापर्यंत १,०९,२४४ जण दगावले आहेत. यात अमेरिकेत गेल्या २४ तासात बळी गेलेल्या ९०७ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासात ब्राझीलमध्ये कोरोनाचे २८,६३३ नवे रुग्ण आढळले असून या देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५,८४,०१६ च्याही पुढे गेली आहे. साथीचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या १९ लाखांवर गेली आहे. गेल्या चोवीस तासात अमेरिकेमध्ये ४० हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जगभरात एक लाखाहून अधिक रुग्णसंख्या असणाऱ्या देशांची संख्या १४ झाली आहे. त्यात अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन, इटली, भारत, फ्रान्स, जर्मनी, पेरू, तुर्की, इराण, चिली व मेक्सिको या देशांचा समावेश आहे.
दरम्यान, अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने कोरोनावर लस बनविण्यासाठी पाच कंपन्यांची निवड केली असून त्यात, फायजर, मर्क, जॉन्सन अँड जॉन्सन, मोडर्ना व अस्ट्राझेनेका यांचा समावेश आहे. तर ब्राझिल सरकारने ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या लसीची रुग्णांवर चाचणी घेण्यास मान्यता दिली आहे.