नवी दिल्ली – पाकिस्तान अस्थिर करण्यासाठी ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) अफगाणिस्तानात सक्रिय असून भारताच्या इशाऱ्याने काम करीत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. यावर अफगाणिस्तानने पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. अफगाणिस्तान सर्वच दहशतवादी संघटनाविरोधात कोणताही भेदभाव न करता कारवाई करीत आहे. ‘टीटीपी’चे दहशतवादीही अफगाणिस्तानातील कारवाईत मारले गेले आहेत. त्याचवेळी ‘जैश’, ‘लश्कर’ सारख्या दहशतवादी संघटनांचे विदेशी दहशतवादी अफगाणिस्तानात पकडले गेले आहेत, अशा मार्मिक शब्दात अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला टोला लगावला. तसेच भारत अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानविरोधात करीत असल्याचे आरोप अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने धुडकावून लावले.
‘टीटीपी’ अफगाणिस्तानातून भारताच्या समर्थनाने पाकिस्तानात कारवाया करीत असल्याचे, संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘ ॲनालिटिकल सपोर्ट अँड सॅंक्शन मॉनिटरींग टीम’ने मान्य केल्याचा दावा गुरुवारी पाकिस्तान सरकारने केला होता. ‘टीटीपी’चा वापर पाकिस्तान अस्थिर करण्यासाठी केला जात आहे, असे आरोप पाकिस्तानाने केले होते. या आरोपांना अफगाणिस्ताननेच पाकिस्तानला थेट उत्तर दिले आहे.
पाकिस्तानचे आरोप बिनबुडाचे असून अफगाणिस्तान सर्वच दहशतवादी संघटनांवर कोणताही भेदभाव न करता कारवाई करीत आहे. ‘टीटीपी’च नव्हे ‘जैश’, ‘लश्कर -ए-तोयबा’ या सारख्या संघटनांचे विदेशी दहशतवद्यांवर अफगाणिस्तानमध्ये कारवाई केल्याची आठवण अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने करून दिली. तसेच यातून दहशतवाद्यांविरोधात लढण्याची अफगाणिस्तानची प्रबळ इच्छाशक्तीही दिसते, असा उपरोधिक टोला अफगाणिस्तान सरकारने पाकिस्तानला लगावला आहे.
सुमारे साडे सहा हजार पाकिस्तानी दहशतवादी अफगाणिस्तानात सक्रिय असल्याचे सयुंक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालात समोर आले होते. यामध्ये ‘जैश’, ‘लश्कर; या पाकिस्तानी दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचे या अहवालात म्हटले आहे. आधीच ‘एफएटीएफ’च्या ग्रे यादीत असलेल्या पाकिस्तानची यामुळे अधिकच नाच्चकी झाली होती. काही महिन्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या देशात ४० हजार दहशतवादी होते याची जाहीर कबुली दिली होती. यावर या अहवालातून शिक्कमोर्तब झाल्याचे दावे विश्लेषक करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने अफगाणिस्तानातून पाकिस्तानविरोधात कारवाया सुरु असल्याचे व यामागे भारत असल्याचे आरोप केला होता. मात्र अफगाणिस्तानने पाकिस्तानला त्यांच्या भूमीतून चालणाऱ्या दहशतवादी कारवायांची आठवण करून देऊन, पाकिस्तानचेच दात घशात घातले आहेत.
याआधी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनीही पाकिस्तानला फटकारले होते. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये फूट पाडण्यात पाकिस्तान यशस्वी होणार नाही. दहशतवाद्यांना आश्रय, प्रशिक्षण कोण देतो, त्यांना शस्त्र पुरवठा कोण करतो, याबाबत अफगाणी नागरीक आणि जगातिक समुदायाला सारे ठाऊक आहे, असे अनुराग श्रीवास्तव म्हणाले होते.