युद्धसरावाद्वारे चीनचा भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्न

बीजिंग – लडाख सीमेवर भारताबरोबर तणाव निर्माण झालेला असताना चीनने भारतावर दडपण टाकण्यासाठी आणखी एक प्रयत्न करून पाहिला आहे. चीनच्या मध्यभागी असलेल्या हुबेई प्रांतातून वायव्येकडील सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक व शस्त्रास्त्रे यांच्या वाहतुकीचा सराव चिनी लष्कराने केल्याची माहिती ग्लोबल टाइम्सने दिली आहे. याचा व्हिडिओ प्रसिद्ध करून चीनने या सरावाद्वारे अल्पावधीत आपले सैन्य व संरक्षण साहित्य सीमेपर्यंत पोहोचवण्याची क्षमता सिद्ध केली, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. त्याच वेळी सध्या भारताच्या सीमेवर भारताबरोबर तणाव निर्माण झालेला आहे, याचाही उल्लेख चीनच्या या सरकारी दैनिकाने केला आहे.

सीमावाद सोडवण्यासाठी भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांंची चर्चा पार पडली. त्याला एक दिवस उलटण्याच्या आत चीनने या लष्करी सरावाचे आयोजन करून भारताबरोबरील सीमावाद सोडविण्याबाबत आपण गंभीर नसल्याचे दाखवून दिले आहे. उलट भारतावर लष्करी दडपण वाढवून चीन या क्षेत्रात वर्चस्व गाजवू शकतो, असा संदेश चीन देत आहे. काही तासात चीन आपले सैन्य व संरक्षण साहित्य सीमेपर्यंत आणून ठेवू शकतो व संघर्ष पेटला तर त्याचा वापरही करू शकतो, हे सिद्ध करण्यामागे चीनचा आणखी एक हेतू असल्याचे दिसते. काही काळानंतर चिनी लष्कराला लडाखमधून माघार घ्यावी लागेल. पण ही माघार घेत असताना सामर्थ्य प्रदर्शन करून चीनची कम्युनिस्ट राजवट आपल्या देशातील जनतेला आपली भारताबरोबरील वादात सरशी झाल्याचे दाखवून यासाठीही चीनची धडपड सुरू असल्याचे दिसते.

भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग व चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीचे मेजर जनरल लीन लियु यांच्यामध्ये शनिवारी चर्चा पार पडली. ही चर्चा सकारात्मक वातावरणात संपन्न झाल्याची प्रतिक्रिया भारताने नोंदविली आहे. तर चीनने या चर्चेबाबत दिलेली अधिकृत प्रतिक्रिया देखील अशाच स्वरूपाची आहे. त्यामुळे दोन्ही देश हा वाद चिघळणार नाही याची दक्षता घेत असल्याचे दिसते. मात्र राजनैतिक पातळीवर चीनकडून ही सावधानता दाखविली जात असतानाच , लष्करीदृष्ट्या आपण अतिशय प्रबळ आहोत. असे चित्र उभे करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. म्हणूनच लडाखमधून सैन्य माघारी घेण्याची वेळ आली तरी आपण भारताला झुकविले असे भ्रामक चित्र चीनला उभे करायचे आहे. सदर युद्धसराव हा चीनच्या या तयारीचा भाग ठरतो. कोरोनाव्हायरसची साथ अत्यंत बेजबाबदारपणे हाताळल्यामुळे जगभरातील बहुतेक देश चीनवर संतापलेले आहेत. अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांनी चीनच्या विरोधात निर्णय घेण्याचा सपाटा लावलेला आहे. अशा परिस्थितीत साऊथ व ईस्ट चायना सीमधील चीनच्या कारवाया या क्षेत्रातील देशांबरोबरच जगभरातील इतर देशांनाही चिंतेत टाकत आहेत. हाँगकाँग व तैवानच्या प्रश्नावरील चीनच्या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सडकून टीका होत आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रवासी विमानसेवेवरून चीनवर केलेल्या कारवाईनंतर या आघाडीवरही चीनला माघार घेणे भाग पडले होते. अशा परिस्थितीत भारताबरोबरील सीमावादात आक्रमक भूमिका घेऊन चीनची कम्युनिस्ट राजवट आपली प्रतिष्ठा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र एका मर्यादेच्या बाहेर जाऊन भारताला दुखावणे परवडणारे नाही, याची पुरेपूर जाणीव चीनला आहे. मुख्य म्हणजे भारताची बाजारपेठ गमावण्याची भीती व आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय जनमत भारताच्या बाजूने आहे याची जाणीव चीनला भारताच्या विरोधात आक्रमक पाऊल उचलू देणार नाहीत. मात्र भारतावर दडपण टाकण्याचा व यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करण्याचा प्रयत्न चीन यापुढेही करीत राहील, असे भारतीय विश्लेषक बजावत आहेत.

leave a reply