जनरल चार्ल्स ब्राऊन अमेरिकेचे नवे वायुसेनाप्रमुख संरक्षणदलाच्या प्रमुख पदी नियुक्त होणारे पहिले कृष्णवर्णीय

वॉशिंग्टन – अमेरिकेतील जनरल चार्ल्स ब्राऊन ज्यु. यांची देशाच्या वायुसेनेचे नवे प्रमुख म्हणून निवड झाली असून लष्करी दलाचे प्रमुख म्हणून कृष्णवर्णीय अधिकाऱ्याची निवड होण्याची अमेरिकेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेच्या संसदेने जनरल ब्राऊन यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून ब्राउन यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. अमेरिकेत सध्या कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात व्यापक निदर्शने सुरू असताना जनरल ब्राऊन यांची झालेली निवड लक्ष वेधून घेणारी ठरते.

जनरल चार्ल्स ब्राऊन, वायुसेनाप्रमुख, वायुसेना

‘अमेरिकेच्या हवाईदलाचे जनरल चार्ल्स ब्राऊन यांची देशाच्या संरक्षणदलातील विभागाचे पहिले कृष्णवर्णीय प्रमुख म्हणून नेमणूक करण्याच्या माझ्या निर्णयाला अमेरिकेच्या सिनेटने मंजुरी दिली आहे. हा अमेरिकेसाठी ऐतिहासिक दिवस आहे. जनरल ब्राऊन हे देशभक्त व उत्तम नेतृत्वगुण असणारे अधिकारी असून त्यांच्याबरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे’, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जनरल ब्राऊन यांच्या नियुक्तीची माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीच मार्च महिन्यात जनरल ब्राऊन यांची वायुसेनेचे प्रमुख म्हणून नियुक्ती व्हावी अशी शिफारस संसदेकडे केली होती.

१९८५ साली अमेरिकेच्या हवाईदलात प्रवेश केलेल्या जनरल ब्राऊन यांनी गेल्या ३५ वर्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यात अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे उपप्रमुख व युएस पॅसिफिक एअरफॉर्सेस चे प्रमुख यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात सिनेट समोर झालेल्या सुनावणीत, जनरल ब्राऊन यांनी ‘नॅशनल डिफेन्स स्ट्रॅटेजी’चा उल्लेख करून त्यातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वायुसेना महत्त्वाची भूमिका पार पडेल पडेल अशी ग्वाही दिली होती.

अमेरिकेत गेल्या दोन आठवड्यांपासून जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यूवरून तीव्र निदर्शने सुरू आहेत. ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या घोषवाक्यासह कृष्णवर्णीयांनावर होणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष वेधले जात आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर ते गौरवर्णीय वर्चस्ववादी भूमिकेचा पुरस्कार करीत असल्याचे आरोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षणदलातील विभाग असणाऱ्या वायुसेनेचे प्रमुख म्हणून कृष्णवर्णीय अधिकाऱ्याची निवड करून ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन जनतेसह आंतरराष्ट्रीय समुदायालाही संदेश दिल्याचे दिसत आहे.

leave a reply