अनंतपुर – आंध्रप्रदेशमधल्या अनंतपुर पोलिसांनी छत्तीसगडमधील माओवाद्यांना स्फोटके आणि इतर सामग्री कुरिअर करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दहा हजार डिटोनेटर्स आणि १,०९८ मीटर इतकी फुझ वायर जप्त केली. या तिघांची कसून चौकशी सुरु असून या संदर्भात नवनवीन माहिती समोर येत आहे.
माओवांद्याना साहित्य पुरविणाऱ्या या तिघांची नावे उघड झाली आहेत. मुथु नागाराजु, अलंकुता रामाणा, देरुंगला बाबू अशी त्यांची नावे आहेत. नागाराजु हा या कटाचा मुख्य सूत्रधार आहे. तो तेलगंणामध्ये राहतो. छत्तीसगडमधील माओवांद्याना तो स्फोटके, औषधे, मोबाईल फोन्स, सीम कार्डस् कुरिअर पुरवायचा. नागाराजु छत्तीसगडमधील माओवांद्याच्या संपर्कात होता. हे साहित्य पुरविण्याच्या मोबदल्यात नागाराजुला माओवांद्याकडून लाखो रुपये मिळायचे.
गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात नागाराजुला अटक करण्यात आली होती. त्याला काही दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. पण काही महिन्यांनी त्याची सुटका झाली. त्यानंतर पुन्हा तो माओवाद्यांच्या संपर्कात आला. काही दिवसांपूर्वी तो आणि त्याचे सहकारी १०,००० डिटोनेटर्स आणि १,०९८ मीटरची फुझ वायर घेऊन छत्तीसगडला जात होते. तेव्हा स्थानिक पोलिसांनी त्यांचे वाहन थांबविले. त्यावेळी या वस्तू जप्त करण्यात आल्या आणि या तिघांना अटक करण्यात आली.