वॉशिंग्टन – हाँगकाँगमधील निदर्शने आणि तैवानच्या प्रश्नावरील चीनच्या भूमिकेचे समर्थन करणारी सुमारे २३ हजाराहून अधिक अकाऊंटस ट्विटरने बंद करुन टाकली आहेत. तसेच चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या या प्रचार मोहिमेला साथ देणाऱ्या दीड लाख अकाऊंटसवर कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरने म्हटले आहे. जागतिक जनमत आपल्या बाजूने वळविण्यासाठी चीनच्या राजवटीने आखलेल्या प्रचार मोहिमेचा हा भाग होता. यावरुन चीनची कम्युनिस्ट राजवट कुठल्याही थराला जाऊ शकते, हे उघड झाले अशी टीका या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. तर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी ट्विटरची ही कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे. हाँगकाँगमध्ये सुरु असलेली चीनविरोधी निदर्शने मोडून काढण्यासाठी तिथले चीनधार्जिणे प्रशासन चीनची कम्युनिस्ट राजवट बळाचा वापर करीत आहे. मात्र याची गंभीर दखल आंतरराष्ट्रीय समुदायाकडून घेतली जात असून जवळपास सर्वच जबाबदार देशांकडून या प्रकरणी चीनवर टीका होत आहे. कोरोनाव्हायरसची साथ चीनने बेजबाबदारपणे हाताळल्यापासून कोरोनाव्हायरस हे चीनचे जैविक शस्त्र असल्याचे आरोप सुरु झाले आहेत. यामुळे जगभरात चीनच्या विरोधात संतापाची भावना दाटून आली आहे. याचे प्रतिबिंब सोशल मीडियावर उमटत आहे. अशा परिस्थितीत आपल्या विरोधातील जनमत बदलण्यासाठी चीनने सोशल मीडियावर प्रचार मोहीम सुरु केली. ट्विटरने अलिकडच्या काही दिवसांमध्ये सुरु केलेल्या हजारो अकाऊंटसमधून चीनच्या राजवटीची प्रचारमोहीम राबविली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. अशी सुमारे २३,००० अकाऊंटस बंद करण्याची घोषणा ट्विटरने केली आहे. तसेच चीनच्या या प्रचारमोहिमेला साथ देणाऱ्या सुमारे दीड लाख अकाऊंटसवर कारवाई करण्यात आल्याची माहिती ट्विटरने दिली.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली असून हा पक्षपात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोनाव्हायरसची साथ चीनने अत्यंत जबाबदारीने हाताळली, हे साऱ्या जगाने पाहिले आहे. असे असतानाही चीनचे समर्थन करणारी अकाऊटंस ट्विटरने बंद केली. पण चीनवर जैविक युध्दाचे तसेच इतरही निराधार आरोप करणाऱ्या अकाऊंटसवर मात्र ट्विटरने कारवाई केली नाही. हा पक्षपात ठरतो. जगभरातील निष्पक्ष जनता याची नक्कीच नोंद घेईल, असा दावा चुनयिंग यांनी केला. ट्विटरने कारवाई केलेले अकाऊंटस चीनवर अधिराज्य गाजविण्याऱ्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाशी निगडीत असल्याची बाब समोर आली आहे. यावरून प्रचारयुध्दात चीनची ही कम्युनिस्ट राजवट कुठल्या थराला जाऊ शकते. ते या छुप्या व फसव्या प्रचारमोहिमेतून जगासमोर उघड झाले आहे, असे ‘ऑस्ट्रेलियन स्ट्रेटिजिक पॉलिसी इन्स्टिट्यूट’च्या ‘इंटरनँशनल सायबर पॉलिसी सेंटर’चे डायरेक्टर फर्ग्युस हँडसन यांनी म्हटले आहे. त्याचवेळी आपल्या जनतेला ट्विटर व इतर सोशल मीडिया वापरण्याची परवानगी न देणारी ही राजवट आपल्या आंतरराष्ट्रीय प्रचार मोहिमांचा भाग म्हणून ट्विटरचा वापर करीत आहे, या दुटप्पीपणावर हँडसन यांनी बोट ठेवले आहे. या आधीच काही पाश्चिमात्य वर्तमानपत्रांनी चीन सोशल मीडियाचा वापर करुन जगभरात आपल्या विरोधात पसरत असलेल्या असंतोषाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आरोप केले होते. कोरोनाव्हायरसची साथ चीनमधून पसरली नाही तर हा विषाणू अमेरिकेने कट करुन जगभरात पसरविल्याचे आरोप सोशल मीडियावर कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या हस्तकांनी सुरु केला होता. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी याची गंभीर दखल घेतली होती. अमेरिकेवर करण्यात येणाऱ्या या आरोपांना चीनच्या कम्युनिस्ट राजवटीची सहमती आहे का? असा प्रश्न पॉम्पिओ यांनी विचारला होता. पण आता चीनच्या या कारस्थानाची माहिती ट्विटरने केलेल्या कारवाईमुळे जगजाहीर झाली आहे. त्यामुळे पुढच्या काळात चीनला सोशल मीडियावरुन आपली प्रचारमोहीम राबविणे तितकेसे सोपे जाणार नाही. गेल्या काही वर्षापासून चीन आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यासाठी व हितसंबंधासाठी आंतरराष्ट्रीय माध्यमसृष्टी प्रचंड गुंतवणूक करीत असल्याचे समोर आले होते. यामुळे जगभरातील ख्यातनाम वृत्तसंस्थाची चीनबाबतची भूमिका बदलू लागल्याची दिसत होती. पण अलीकडच्या काळात कोरोनाव्हायरसची साथ हाँगकाँगमधील कारवाई व तैवानबाबतची भूमिका यामुळे चीन आंतरराष्ट्रीय तिरस्काराचा विषय बनला आहे. खुद्द चीनच्या अभ्यासगटाने आपल्या सरकारला याची जाणीव करुन दिली. १९८९ साली तिआनमेनमधील चौकातील लोकशाहीची मागणी करणाऱ्या हजारो नागरिकांवर अमानुष कारवाई केल्यानंतरही आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये जेवढी चीनच्या विरोधात भावना होती त्याहून कितीतरी पट अधिक प्रमाणात जगभरात चीनच्या विरोधात असंतोष असल्याचे चिनी अभ्यासगटाने या आपल्या अहवालातून बजावले होते.