बलोचिस्तान, खैबर पख्तूनवामधील हजारो जण कुठे गायब झाले?

- 'यूएनएचआरसी'मध्ये भारताचा पाकिस्तानला सवाल

वॉशिंग्टन – संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार (यूएनएचआरसी) परिषदेत जम्मू आणि काश्मीरमध्ये भारताकडून प्रचंड अत्याचार सुरु असल्याचा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला भारताने सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. ”भारतावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या पाकिस्तानने आधी आपला इतिहास पाहावा.बलोचिस्तान, खैबर पख्तूनवामधील हजारो नागरिक कुठे गायब झाले? पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार कोणत्या श्रेणीत मोडतात?”, असे मर्मभेदी प्रश्न भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील फर्स्ट सेक्रेटरी सेंथिल कुमार यांनी विचारले. तसेच आपण नरसंहार करून त्यांचे आरोप दुसऱ्यावर लावणार पाकिस्तान दक्षिण आशियातील एकमेव देश असल्याचा टोला सेंथिल कुमार यांनी लगावला.

‘यूएनएचआरसी’चे ४३ वे सत्र सुरु असून सोमवारी पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये नरसंहार केला जात असल्याचा थयथयाट केला होता. तसेच जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यावर येथे प्रचंड अत्याचार आणि मानवाधिकाराचे उल्लंघन केले जात असल्याचा बेछूट आरोप केले होते. भारताने यावर पाकिस्तानला जोरदार चपराक लगावली आहे.

बलोचिस्तान, खैबर, पख्तून

”पाकिस्तानने आधी आपल्या देशात काय चालले ते पहावे. त्यानंतरच दुसऱ्या देशाला सल्ला द्यावा. बलोचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराची कारवाई, हिंसाचार, अपहरण, हत्या ही नित्याची बाब बनली आहे. आतापर्यंत जवळपास ४७,००० बलोच आणि ३५,०० पश्तून बेपत्ता आहेत. बलोचिस्तानमध्ये हिंसाचारात ५०० हून अधिक हजारावंशियांचा बळी गेला आहे. तर कित्येक हजारा वंशियांनी पाकिस्तान सोडले आहे”, याकडे पाकिस्तानने लक्ष द्यावे’ अशा शब्दात सेंथिल कुमार यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला. तसेच बलोचिस्तान, खैबर पख्तूनवामधून हे नागरिक कुठे गायब झाले? असा रोकडा सवाल सेंथिल कुमार यांनी केला.

”पाकिस्तान ‘यूएनएचआरसी’ सारख्या आंतराष्ट्रीय व्यासपीठाचा दुरुपयोग करीत आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांची अवस्था काय आहे. धार्मिक कट्टरतावादा आणि हिंसेच्या कितीतरी घटना ज्या देशात नेहमी घडतात. अशा घटनांनी ज्या देशाचा इतिहास भरलेला आहे, त्याने दुसऱ्यांना फुकटचे सल्ले देण्यापेक्षा आपला इतिहास तपासावा, असे सेंथिल कुमार यांनी खडसावले. तसेच भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यामुळे कोणतेही परिणाम झालेले नाहीत. मात्र पाकिस्तान येथे अशांतता माजविण्याचा प्रयत्न करीत आहे, हे सुद्धा सेंथिल कुमार यांनी लक्षात आणून दिले.

दरम्यान भारत संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी येणार असून भारताची निवड निश्चित मानली जाते. यावर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी चिंता व्यक्त केली. जम्मू-काश्मीरमध्ये भारताकडून अत्याचार सुरु असून भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या काश्मीरबाबतच्या ठरावावर कधीही अमलबजावणी केली नाही. त्यामुळे भारताला अस्थायी सदस्यत्व मिळणे समाधानाची बाब ठरत नाही, असे कुरेशी यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थितीत करण्यासाठी धडपडत असून प्रत्येक ठिकाणी अपयश हाती पडत आहे. पाकिस्तानने आता ‘पीओके’ वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत असे पाकिस्तानातीलच विश्लेषक सांगत आहेत. कलम ३७० हटविल्यानंतर आणि जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी मारले जात असताना पाकिस्तान अस्वस्थ बनला आहे. आपल्या जनतेला आपण काश्मीर मुद्दा सोडलेला नाही, हे दाखविण्यासाठी पाकिस्तानचे हातपाय मारत असल्याचे स्पष्ट दिसते.

leave a reply