नवी दिल्ली – उत्तर प्रदेश सरकारच्या ‘आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार अभियाना’चा शुभारंभ शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. केंद्र सरकारने गावी परतलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ सुरु केले आहे. यालाच अधिक व्यापक रूप देऊन ‘आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार अभियाना’ आखण्यात आली आहे. यामुळे उत्तरप्रदेशमध्ये येत्या काही दिवसात सव्वा कोटी रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे स्थलांतरित मजूर मोठ्या प्रमाणावर गावी परतले. देशभरातून एकट्या उत्तरप्रदेशमध्ये ३० लाख स्थलांतरीत मजूर परतले आहेत. गावी परतलेल्या या मजुरांना स्थानिक स्तरावरच रोजगार उपल्बध व्हावा, यासाठी उत्तर प्रदेश सरकारने आखलेल्या ‘आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार अभियाना’चे पंतप्रधानांनी कौतूक केले. केंद्र सरकारच्या ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’चा गुणात्मक विस्तार ‘आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार अभियाना’द्वारे उत्तर प्रदेश सरकारने केल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. यापासून इतर राज्ये प्रेरणा घेतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
उत्तर प्रदेश सरकारच्या या कार्यक्रमामुळे ६० लाख जणांना ग्रामीण भागात विकास कार्यक्रमाशी जोडलेल्या उपक्रमातून श्रमिकांना रोजगार मिळेल. तसेच ४० लाख जणांना लघु आणि मध्यम उद्योगातून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती यावेळी पंतप्रधानांनी दिली. तसेच स्वयंरोजगारासाठी हजारो जणांना १० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप होणार असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, कोरोनाव्हायरसच्या साथी विरोधात उत्तरप्रदेश देत असलेल्या लढ्याचे विशेष कौतुक केले. युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, इटली आणि स्पेनची मिळून जेवढी लोकसंख्या आहे, तेवढी एकट्या उत्तरप्रदेशची आहे. मात्र या देशात या साथीने किती थैमान घातले, हे साऱ्यांनी पहिले आहे. उत्तप्रदेश सरकारने कोरोनाची साथ रोखण्यासाठी कठोर पावले उचलल्यामुळे ८५ हजार जणांचे प्राण वाचले, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. तसेच या साथीवर लस येईपर्यंत ‘दो गज दूरी’ आणि मास्क परिधान करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.