भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५ लाखांच्या पुढे – महाराष्ट्रात एका दिवसात ५ हजार रुग्ण आढळले

नवी दिल्ली/मुंबई – देशातील कोरोनाव्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या ५ लाखांच्या पुढे गेली आहे. केवळ सहा दिवसात देशात लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली असून महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूत नवे रुग्ण सापडण्याचा दरदिवशी नवा उच्चांक होत आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात १७५ जण दगावले आणि ५ हजाराहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळले.

रुग्णांची संख्या ५ लाखांच्या पुढे

गुरुवारपासून शुक्रवारच्या सकाळपर्यंत देशात ४०७ जण दगावले, तर १७,२९६ नवे रुग्ण आढळले होते. सलग दुसऱ्यादिवशी देशात १७ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. यामुळे या साथीच्या रुग्णांची संख्या ४ लाख ९० हजरांपर्यंत पोहोचली होती. तर शुक्रवारी रात्री विविध राज्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाच्या बळींची संख्या साडे पंधरा हजारांवर, तर एकूण रुग्णांची संख्या ५ लाख ५ हजारांवर गेल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्रातच चोवीस तासात १७५ जणांचा बळी गेला आणि ५ हजार २४ नवे रुग्ण सापडले. गुरुवारीही राज्यात सुमारे पाच हजार रुग्णांची नोंद झाली होती. महाराष्ट्रात चोवीस तासात सुमारे पाच हजार रुग्णांची नोंद होऊ लागल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. महाराष्ट्रातील रुग्ण संख्या दीड लाखांवर पोहोचली आहे. मुंबईत ४४ जण चोवीस तासात दगावले असून १२९७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

दिल्लीत चोवीस तासात ९३ जणांचा बळी गेला, तसेच ३४६० नवे रुग्ण आढळले. दिल्लीत विशेष कोरोना रुग्णालयांचे व्यवस्थापन करण्यासाठी लष्कराची मदत घेण्यात येणार आहेत. तसेच लष्कराचे वैद्यकीय पथकही दिल्लीत दाखल झाले आहे. शुक्रवारी तामिळनाडूतही ३६४५ नव्या रुग्णांची नोंद झाली. गुजरातमध्ये १८ जणांचा बळी गेला आणि ५८० नव्या रुग्णांची नोंद झाली. आंध्र प्रदेशात ६०५, तर पश्चिम बंगालमध्ये ५४२ नव्या रुग्णांची नोंद झाली.

दरम्यान, पश्चिम बंगाल पाठोपाठ झारखंड आणि आसाम सरकारनेही आपल्या राज्यात लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली आहे.

leave a reply