पिथोरागड – भारतीय भूभाग आपल्या नकाशात दाखवून सीमावाद उकरून काढणाऱ्या नेपाळने आता सीमेनजीक रस्ता बांधकामास सुरुवात केल्याचे समोर आले आहे. ‘महाकाली कॉरिडॉर’अंतर्गत पिथोरागड जिल्ह्याच्या सीमेवर धारचूला-टिंकर भागात या रस्त्याचे काम सुरू केले आहे. येथे यासाठी एक हॅलीपॅडही बनविण्यात आले असून शनिवार येथे नेपाळी लष्कराचे हेलकॉप्टर उतरले होते. नेपाळ रस्त्याचे बांधकाम काली नदीला लागून असलेल्या धारचूला आणि बैतडीमधल्या गावांपर्यत करणार आहे. यामुळे नेपाळला चीन सीमेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा होणार आहे. त्यामुळे या रस्ते बांधकामांसाठी नेपाळला चीनची फूस असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान भारताने उत्तराखंडमध्ये नेपाळ सीमेलगत सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) जवानांची तैनाटो वाढविल्याच्या बातम्या आहेत.
उत्तराखंडमध्ये भारत आणि नेपाळची सीमा पिथोरागड आणि चंपावत जिल्ह्यांना लागून आहे. यात पिथोरागडमध्ये दोन्ही देशांची सीमारेषा दीडशे किलोमीटर इतकी आहे. चंपावत जिल्ह्याच्या बनबसा गावात पूल आहे. पिथोरागडच्या झूलाघाट ते सीतापूलला जाण्यासाठी छोटासा पूल आहे. या दोन्ही पुलांचा वापर नेपाळी नागरिक मोठ्या प्रमाणावर करतात.. बरेचसे नेपाळी नागरिक दुसऱ्या गावात ये-जा करण्यासाठी भारतीय सीमेतील रस्त्याचा वापर करतात. केवळ गावकरीच नाही तर नेपाळच्या लष्करच्या जवानांकडूनही याचा वापर केला जातो. पण आता नेपाळ धारचूला आणि बैतडीमध्ये डझनभराहून अधिक रस्ते बांधत आहे. हे रस्ते उभारून सीमेजवळच्या गावांना मुख्य प्रवाहात आणण्यात येणार आहे. पण यापेक्षा चीन सीमेजवळ पोहोचणे नेपाळसाठी अधिक सोपे होणार आहे,हे स्पष्ट होते.
सध्या भारताबरोबर नेपाळने सीमावाद उकरून काढल्यानंतर काली नदीच्या अर्ध्या डझनांहून अधिक भागात नेपाळ लष्कराकडून सीमा चौक्या उभारल्या जात असून इथे जवान तैनात केले जात आहेत. नेपाळी जनतेचे भारतीय रस्त्यावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी नेपाळ सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र चीनच्या इशाऱ्यावर नेपाळच्या के.पी. शर्मा ओली यांचे सरकार काम करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.