अमेरिका ‘क्वाड’ देशांच्या लढाऊ वैमानिकांना प्रशिक्षण देणार

वॉशिंग्टन – इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांच्या सहाय्याने सदर क्षेत्रातील आपल्या हालचाली अधिक आक्रमक केल्या आहेत. ‘क्वाड’ अंतर्गत येणाऱ्या भारत, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांच्या वैमानिकांना लढाऊ विमानांचे प्रशिक्षण देणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. चीनच्या सागरी क्षेत्रापासून २६०० किलोमीटर अंतरावर असलेल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील गुआम बेटावर अमेरिका हे प्रशिक्षण देणार आहे. युरोपातील आपले सैन्य इंडो-पॅसिफिक क्षेत्रांमध्ये तैनात करण्याची घोषणा केल्यानंतर पुढच्या काही तासात अमेरिकेने ‘क्वाड’बाबत घेतलेला हा निर्णय चीनसाठी इशारा ठरतो.

‘क्वाड’

अमेरिकन सिनेटच्या ‘आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी’समोर बिल सादर करण्यात आले. अमेरिकेच्या ‘नॅशनल डिफेन्स ऑथोरायझेशन ॲक्ट’ अंतर्गत इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याला बळकटी देण्यासाठी सहकारी आणि मित्रदेशांना सज्ज करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यासाठी अमेरिकेने संघटित केलेल्या ‘क्वाड’ अंतर्गत येणाऱ्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांना विशेष लष्करी सहकार्य पुरवण्याचे स्पष्ट करण्यात आले. यासाठी संबंधित देशांच्या वैमानिकांना लढाऊ विमानांचे प्रशिक्षण देण्यासंबंधीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. ‘सिनेट आर्म्ड सर्विसेस कमिटी’चे अध्यक्ष जिम इनहॉप यांनी ही माहिती दिली. येत्या काही आठवड्यांमध्ये अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात.

येत्या काळातील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या सहकारी आणि मित्रदेशांना सज्ज करण्याच्या उद्देशाने अमेरिका हे प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणाअंतर्गत अमेरिका इंडो-पॅसिफिक क्षेत्रात महत्त्वाच्या हालचालीही करणार आहे. यामध्ये लांब पल्ल्याच्या विनाशिकाभेदी क्षेपणास्त्रांच्या तैनातीचाही निर्णय घेतला जाऊ शकतो. या क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका हा निर्णय घेईल, असा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत. त्याचबरोबर चीनच्या लष्करी हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या ‘क्वाड’ देशांचे संयुक्त लष्करी तळ देखील या क्षेत्रात कार्यरत होऊ शकते. सदर संयुक्त लष्करी तळ चीनसाठी सर्वात मोठे आव्हान ठरू शकते.

leave a reply